वेरूळ आंतरराष्ट्रीय महोत्सवाला उद्यापासून (दि. १४) सुरुवात होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी औरंगाबादला पर्यटन सार्क परिषद होणार होती, ती आता गुंडाळण्यात आली आहे. औरंगाबादच्या पर्यटनाबाबतचा हा धांडोळा.

अजिंठा व वेरूळ या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत किंचितशी वाढ असली तरी दोन पर्यटनस्थळांमधील पर्यटक गळतीचे प्रमाणही ५० टक्क्यांहून अधिक आहे. पर्यटनस्थळांची माहिती दर्शविणारे साधे फलक लावण्याचे साधे कामही शासकीय यंत्रणांनी पूर्ण केलेले नाही. आता पर्यटन वाढीसाठी उत्सवप्रियतेला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून वेरूळ महोत्सवातून मनोरंजनाच्या कार्यक्रमाची आखणी जोरदारपणे केली आहे. वेरूळ लेणी पाहण्यासाठी या वर्षी २७ हजार ६११ विदेशी पर्यटकांनी हजेरी लावली. गेल्या वर्षी हा आकडा २८ हजार ७८२ एवढा होता. या विदेशी पर्यटकांची संख्या २८ हजारांच्या वर गेली नव्हती. दुसरीकडे विदेशी पर्यटन वाढविण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून धोरणात्मक निर्णय न आखता बडय़ा कलावंताच्या संगीत रजनीमुळे पर्यटनाला चालना मिळेल, असा दावा केला केला जात आहे.

औरंगाबाद जिल्हय़ात पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात सहा पर्यटनस्थळे आहेत. त्यातील बीबी का मकबरा आणि औरंगाबाद लेणी ही दोन पर्यटनस्थळे शहरात आहेत. वेरूळ आणि अजिंठा येथील लेणी पाहण्यासाठी विदेशी पर्यटक येतात. शहरापासून जवळच असल्याने वेरूळ लेणी पाहणाऱ्यांची संख्या तुलनेने अधिक असते. सरासरी २८ हजार विदेशी पर्यटक दरवर्षी येतात. त्यांच्यासाठी २०० रुपये तिकीट आकारले जाते. त्यातून वर्षांकाठी १ कोटींहून अधिक रक्कम मिळते. मात्र हवाई वाहतुकीच्या सुविधा नीट नसणे तसेच पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे पर्यटनाला म्हणावा तसा वेग देता आलेला नाही. या पर्यटनस्थळांची माहिती विदेशात पोहोचविण्यासाठी केले जाणारे उपक्रम तोकडे पडतात. परिणामी विदेशी पर्यटकांची संख्या घटते आहे. देशी पर्यटक येतात खरे; पण त्यांना नीटपणे इतिहास, तत्कालीन राजकीय व्यवस्था, अर्थकारण समजावून सांगणारे तसे कमीच आहेत. गेल्या कित्येक दिवसांत दुभाषिकांना प्रशिक्षणही देण्यात आलेले नाही. वेरूळ येणाऱ्या २८ हजार पर्यटकांपैकी अजिंठय़ाची लेणी पाहणाऱ्यांची संख्या गेल्या चार वर्षांत ४ हजाराने घटली आहे. औरंगाबाद लेणी आणि बीबी का मकबऱ्यापर्यंत चौपट पर्यटक कमी होतात. ही गळती रोखण्यासाठी काहीही प्रयत्न होताना दिसत नाहीत. आता पर्यटनाच्या नावाखाली वेरूळ महोत्सव घेतला जाणार आहे. काही वर्षांपूर्वी कलावंतांचे आकर्षण असे. त्यांना पाहण्यासाठी रसिक हजेरी लावत. त्यातून पर्यटन वाढत असे. आता तसे आकर्षक कमी झालेले असताना पुन्हा एकदा जुन्याच धाटणीचे मनोरंजनात्मक कार्यक्रम पर्यटनाला कसा हातभार लावू शकतील, असा सवाल केला जात आहे. अलीकडेच पर्यटनस्थळांच्या माहितीचे फलक लावण्यासाठी काही हालचाली सुरू झाल्या आहेत. हेरिटेज वॉकसारख्या कार्यक्रमात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अजूनही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती पोहोचवून औरंगाबादचे नाव जागतिक पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरावे, अशा प्रयत्नांना सुरुवात झालेली नाही. राजस्थानच्या तुलनेत अधिक चांगली पर्यटनस्थळे असूनही त्याचा योग्य उपयोग होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

दोन ‘पांढरे हत्ती’

पर्यटनाला चालना मिळावी म्हणून अजिंठा आणि वेरूळ येथे प्रत्येकी एक ‘व्हिजिटर सेंटर’ बांधण्यात आले. कोटय़वधी रुपयांचा खर्च करण्यात आला. अगदी लेणींची प्रतिकृती पायथ्याशीच उभी केली. मात्र प्रत्यक्ष लेणी बघणे हेच पर्यटकांचे प्राधान्य असल्याने याकडे फिरकतही नाहीत. मोठी गुंतवणूक करूनही त्याचा उपयोगच होत नसल्याचे दिसून आले आहे. हे व्हिजिटर सेंटर जणू पर्यटन क्षेत्रातील पांढरे हत्तीच झाले आहेत. ही गुंतवणूक वापरात आणता यावी, यासाठी प्रशासकीय स्तरावर काही एक हालचाल होताना दिसत नाहीत.

ज्या काळात पर्यटकांची संख्या अधिक नसते, त्या काळात पर्यटनातून अर्थकारणाला चालना मिळावी म्हणून महोत्सव आयोजित केले जातात. जगभरात अशी पद्धत आहे. मात्र आपल्याकडे पर्यटकांची संख्या अधिक असताना गेल्या २०-२५ वर्षांपासून महोत्सव घेतले जातात. त्याची विदेशात जाहिरात होत नाही. त्यामुळे असे महोत्सव विदेशी पर्यटक येण्यासाठी फारसे उपयोगी पडत नाहीत. दुसरे असे की, औरंगाबाद लेणीसारख्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळाची माहिती नीटपणे पोहोचवलीच गेली नाही. बुद्धिस्ट सर्किटमध्ये वज्रयान पंथाला भारताबाहेरही मोठे स्थान आहे. औरंगाबाद लेणीतील शिल्प हे तो वारसा सांगणारे असल्याचे अजून जगाला कळलेलेच नाही. तशी माहितीच आपल्याकडून पोहोचवली जात नाही. परिणामी दोन पर्यटनस्थळांमध्ये पर्यटकांची गळती मोठय़ा प्रमाणात दिसते.’’

– डॉ. राजेश रगडे पर्यटन विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

aur-chart1