माथ्यापासून पायथ्यापर्यंत सर्वागीण पद्धतीने सुरू असणाऱ्या मृद् व जलसंधारण कार्यक्रमामुळे फुलंब्री तालुक्यातील पाच गावांचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी व्यक्त केले.
दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. या वित्तपुरवठा करणाऱ्या कंपनीच्या वतीने सामाजिक दायित्व निधीतून मृद् व जलसंधारणाचे उपक्रम सुरू आहेत. डॉ. दांगट म्हणाले, की फुलंब्री सातत्याने दुष्काळाच्या सावटाखाली सापडणारा तालुका असून, तालुक्यातील बाभूळगाव, वाघोळा, चिंचोली, नांद्रा व दरेगाव या पाच गावांमध्ये तीन वर्षे एकात्मिक पद्धतीचे जलसंधारण केले जाणार आहे. मराठवाडय़ातील दुष्काळी स्थितीचे वर्णन करून दांगट म्हणाले, की आगामी काळात शेतकऱ्यांनी कूपनलिका खोदण्यास प्रतिबंध केला पाहिजे. बीटी कॉटन आणि उसाच्या प्रेमात जास्त अडकण्यापेक्षा पारंपरिक पिकांत आंतरपीक घेण्याची गरज आहे. मराठवाडय़ातील बदलत्या हवामान बदलास सामोरे जाण्यासाठी पॉलीहाऊस, ग्रीनशेड शेतीपद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. गिरसावळीमध्ये काँक्रीटीकरण केलेले शेततळे, ठिबक सिंचन, कुक्कुटपालन या सर्व ठिकाणी भेटी देऊन त्यांनी शेतक ऱ्यांशी चर्चा केली.
देवनचे उपाध्यक्ष एस. गोविंदन यांनी पाच गावांतील या प्रकल्पामुळे शाश्वत शेतीतंत्र उभे राहिले असे म्हटले. पुरुषोत्तम अवस्थी यांची या वेळी उपस्थिती होती. संस्थेच्या अध्यक्ष डॉ. अनघा पाटील यांनी, दुष्काळी स्थितीत पाणलोट विकास कार्यक्रम हीच शाश्वत विकासाची गुरुकिल्ली आहे. त्यास महिला विकासाची जोड देणे अनिवार्य आहे, असे सांगितले.