|| सुहास सरदेशमुख

औरंगाबादमधील तंत्रज्ञाने केलेली प्रणाली लवकरच सर्वत्र वापरात

अकुशल किंवा अंगमेहनतीच्या कामासाठी उद्योगांना यापुढे ‘राघव’, ‘सेवक’ आणि ‘वामन’ उपयुक्त ठरणार आहेत. ही नावे कुणा बलशाली व्यक्तींची नसून औरंगाबादमधील औद्योगिक वसाहतीत अत्यंत मोलाची कामगिरी करणाऱ्या रोबोंची आहेत. औरंगाबाद येथील तरुण उद्योजक रोहित दाशरथी यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले असून वर्षभरात अशा प्रकारचे साडेतीन हजारांहून अधिक रोबो बनविण्याचा उद्योग ते चालवीत आहेत.

विनाचालक श्रेणीतील मोटारी अशी या रोबोंची रचना असून ५० ते दीड टन वजनाची ने-आण ती सहज करीत आहेत. विमानतळावर प्रवासी सामानाची ने-आण करण्यासाठी आगामी काळात ‘सेवक’ नावाचा रोबो दिसू शकेल. मुंबई आणि औरंगाबादच्या विमानतळ प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची ही प्रणाली लागू करण्यासंदर्भात बोलणी सुरू आहे.

विनाचालक मोटारीच्या श्रेणीतील रोबो तंत्रज्ञान बनविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग दाशरथी यांनी केले. सुरुवातीच्या काळात एका लोखंडी पट्टीवर वजन वाहून किंवा ओढून नेणारी यंत्रणा विकसित करण्यात आली. मात्र, काही उद्योगसमूहात लोखंडी धावपट्टी बनविणे अडचणीचे वाटू लागल्यानंतर रंग ओळखून त्या रंगाच्या पट्टय़ाच्या आधारे सामानाची ने-आण करणारा रोबो तयार करण्यात आला. आता त्यात आणखी बदल करण्यात आले असून अगदी खड्डे किंवा ओबडधोबड जमिनीवर सामानाची ने-आण करू शकणारा रोबोही विकसित करण्यात आला आहे. त्याच्या क्षमतेनुसार त्याला नावे देण्यात आली आहेत. मोबाइलवरून त्याने किती वेळ आणि कोठे थांबावे यांचे नियंत्रण करता येते. ‘सेन्सर’च्या आधारे ही प्रणाली विकसित करण्यात आल्याचे दाशरथी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. हे तंत्रज्ञान विकसित करण्यापूर्वी रोहित यांनी ‘रोबोटिक्स सिस्टम डेव्हलपमेंट’ या क्षेत्रात एम.एस.पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

विमानातून उतरल्यानंतर विमानतळाबाहेर पडताना नेहमी प्रवाशांना ओझे वागवावे लागते किंवा सामान ओढत न्यावे लागते. वयोवृद्ध व्यक्तींना तर त्याचा अधिक त्रास जाणवतो. यावर उपाय म्हणून ‘सेवक’ हा रोबो विकसित करण्यात आला आहे. ही एक प्रकारची ट्रॉलीच आहे. पण त्याला कॅमेरा आहे. तो प्रवासी व्यक्तीचे पाठमोरे छायाचित्र साठवून घेतो. आणि ज्याचे सामान आहे त्याच्या पाठीमागे तीन मीटर अंतर ठेवत चालू लागतो, अशी संरचना असणारी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. मार्गात अडथळे आले तर तो थांबतो आणि पुन्हा चालू लागतो.

बॅटरी चार्जिग संपले तर रोबो हलविण्यासाठी माणसांची गरज लागणार नाही. मोबाइल रिमोटच्या आधारे त्यांना चार्जिग पॉइंटपर्यंत आणता येईल. त्यातील एक रोबो स्वत:च्या ‘चार्जिग स्टेशन’पर्यंत जाऊ शकतो. औरंगाबाद येथे ‘ऑटोमोटिव्ह’ क्षेत्रात मोठी उलाढाल होते. दुचाकी, चारचाकी आणि ऑटो रिक्षाही येथे बनतात. या कारखान्यांमध्ये ओझे वाहून नेण्यासाठी या रोबोचा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. वर्षभरात साडेतीन हजार रोबो बनविण्याची क्षमता असणारा हा उद्योग नवीन बदलाचे कारण ठरेल, असे रोहित दाशरथी सांगतात.

यंत्रांना ‘कृत्रिम शहाणपण’ देण्याचा प्रयत्न

सध्या ‘राघव’, ‘सेवक’ रोबोंचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तिसरा रोबो उंचीला कमी असल्याने त्याचे नावे ‘वामन’ ठेवण्यात आले आहे. ज्या भागात या रोबोला काम द्यायचे आहे. त्याला त्या भागात एकदा फिरवून आणले की तो त्या भागाचा नकाशा साठवून घेतो आणि सांगितलेल्या सूचनेनुसार एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो. या यंत्रांना कृत्रिमपणे शहाणपण देणारे संगणकीय प्रोगाम तयार केले जातात. विशेष म्हणजे या क्षेत्रातील तंत्रज्ञानासाठी कोणत्याही परदेशी तज्ज्ञांची मदत घेण्यात आलेली नाही. मात्र ‘वामन’ निर्मितीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

निर्मिती कुठे?

सेन्सर आणि बॅटरीच्या साहाय्याने संगणकीकृत मार्गावर थांबे घेत वा थेटपणे भारवाही काम हे रोबो सहजपणे करू शकतात. ऋचा इंडस्ट्रीजच्यावतीने औरंगाबाद येथील शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये ‘रोबो’ तंत्रज्ञानाच्या आधारे वेगळे वेगळे प्रयोग केले जात आहेत. सध्या दिवसाला दहा रोबो बनविले जात आहेत.

बॅटरीच्या साहाय्याने चार-पाच तास चार्ज झाल्यानंतर १३ तासापर्यंत सामानाची ने-आण करण्यासाठी हे यंत्र वापरता येऊ शकते. विशेषत: कारखान्यामध्ये मोठय़ा प्रमाणात ओझे उचलण्याचे काम करावे लागते. त्यात कुशलता अशी नसते. कोणीतरी त्यासाठी राबत असते. त्याऐवजी हे रोबो हे काम करू शकतील. जेवढी ओझे वाहून नेण्याची क्षमता तेवढी त्याची किंमत. साधारणत: साडेआठ लाखापासून ते १३ लाखांपर्यंत मिळणारे हे रोबो आता वापरले जाऊ लागले आहेत. हे भारवाही रोबो येत्या काळात अनेक ठिकाणी दिसू लागतील, असा त्यांचे निर्माते रोहित दाशरथी यांना विश्वास आहे.