सुहास सरदेशमुख

मराठा आरक्षण दिल्यानंतरही त्याचा लाभ मिळाला नाही, ही भावना मराठा समाजात तीव्र होत गेली आणि त्याचा फटका पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजपला बसला असावा. तसेच उमेदवार निवडीत चुकलेली सामाजिक समीकरणे हेही पराभवाचे प्रमुख कारण भाजपच्या पराभव चिकित्सा समितीला आढळले असावे. पण पक्षरचनेत असे निर्णय घेताना होणाऱ्या चुकांना जबाबदार कोण, यावर भाजपमध्ये कोणीही भाष्य करणार नाही.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीहीन मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’मधील दिग्गज मराठा नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याने निर्माण झालेल्या प्रतिमेमुळे दुखावलेला ओबीसी वर्गही भाजपपासून दुरावला. त्याचाही परिणाम पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवर झाला. पराभवाचे हे चित्र किती नेमकेपणाने मांडले जाते, आणि त्याची किती दखल घेतली जाते, हे महत्त्वाचे. मराठवाडय़ात चंद्रशेखर बावनकुळे यांचना दौऱ्यात नेमके दुखणे  काय हे कळले असेलच.

५८ मराठा मोर्चे, आरक्षणासाठी सुरू असणाऱ्या याचिकांमधील मराठवाडय़ातील व्यक्तींचा सहभाग लक्षात घेता मराठा मतदार महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल, अशी शक्यता पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार निवडताना न घेतल्याने मोठय़ा फरकाने सतीश चव्हाण यांना विजय मिळाला. जुन्या मतदारयादीमधील बराच मतदार भाजपचा होता. ती यादी रद्द केल्यानंतर नोंदणीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष दिले नाही. तुलनेने संस्थात्मक पकड मजबूत असणाऱ्या आमदार सतीश चव्हाण यांनी मात्र हे सारे पद्धतशीरपणे केले होते. त्यांचा संपर्क चांगला होता. पुढच्या निवडणुकांची तयारी करत राहणारा व्यक्ती अशी त्यांची ओळख भाजप नेत्यांपर्यंतही पोहचली. उमेदवारी जाहीर करण्यास लागलेला उशीर त्यातही प्रवीण घुगे की शिरीष बोराळकर याबाबतची द्विधा याचाही परिणाम झाला. अशी स्थिती नागपूर पदवीधरची होती. टिच्चून काम करणारा कार्यकर्ता उमेदवार नसणे अशी अनेक कारणे भाजपच्या पराभव चिकित्सा समितीपर्यंत पोहचली आहेत. त्यावर उपाय म्हणून पुढील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दोन वर्षे आधीच उमेदवार निवडला जाणार आहे. त्यामुळे ज्याला निवडणूक लढवायची आहे त्याला आतापासून मराठवाडय़ात संपर्क ठेवावा लागेल. पण भाजपमध्ये पक्षाचे काम करण्याची कार्यपद्धती काय, असे कोणी विचारले तर त्याचे उत्तर नेत्यांच्या गाडी मागे गाडी लावणे असेच असल्याचे काही कार्यकर्ते आवर्जून सांगतात.

सतीश चव्हाणांची शक्तीस्थळे आणि भाजपमधील त्रुटी आणि त्यातून निर्माण झालेली कार्यकर्त्यांमधील दरी याचा अहवाल बावनकुळे कितपत कागदावर आणतात आणि पराभवाची मिमांसा किती गांभीर्याने केली जाते यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.

आमच्या काही चुका झाल्या आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर समोर आलेली निरीक्षणे पक्षप्रमुखांच्या बैठकीत ठेवली जातील. पण येत्या काळात सामाजिक समीकरणांचा अभ्यास करून दोन वर्षांच्या पूर्वतयारीने काम करावे लागेल. किमान उमेदवार आधी ठरवावा लागेल.

-चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते