सुहास सरदेशमुख

वाढत्या इंधन दरामुळे दुचाकी वाहन खरेदीमध्ये विद्युत आधारित वाहन खरेदीचा कल वाढला असला तरी दुचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या कर्ज वितरणासाठी राष्ट्रीयीकृत बँका फारशा पुढाकार घेत नाहीत. परिणामी काही खासगी बँका आणि लघु पुरवठा करणाऱ्या संस्थांमधून ११ टक्क्यांपर्यंत इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी व्याज आकारणी होते. गेल्या महिनाभरात पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या पुढे गेल्याने आता दुचाकी घेताना विद्युत वाहनांकडे कल वाढला आहे. टाळेबंदीच्या काळात  नव्याने देण्यात आलेल्या सवलतींमुळेही हा खरेदीचा कल चढाच होता. आता दुचाकीच्या नोंदीनंतर आठवडाभर थांबावे लागत आहे.

औरंगाबाद येथे इलेक्ट्रॉनिक दुचाकी वाहनाचे व्यापारी आशिष अग्रवाल म्हणाले,‘ टाळेबंदीत सूट मिळाल्यानंतर बाजारपेठेत अनिश्चितता होती. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते नव्या पद्धतीच्या इलेक्ट्रॉनिक वाहनांकडे वळतील का याविषयी शंका होती. पण जसजशा इंधन किमती वाढत गेल्या तसतसे विद्युत दुचाकी विक्रीमध्ये वाढ होत आहे. १५ फेब्रुवारी रोजी ६२ दुचाकी होत्या.  पुढील चारच दिवसात त्यांची विक्री झाली होती.  त्यानंतर हा विक्रीचा चढता आलेख दिसून येत आहे.

बॅँकांचा हात आखडता

बॅंका इलेक्ट्रॉनिक वाहनांना कर्ज पुरवठा करताना हात आखडता ठेवत आहेत. कर्ज देण्यासाठी बँकांकडून टाळाटाळ होत असल्याने सारे घोडे अडत असल्याचे व्यापारी सांगातात. ‘मुद्रा’ योजनेतून काही वेळा कर्ज मंजूर होते. पण बहुतांश वेळा कर्ज नाकारले जाते. अधिक व्याज दराची गाडी घ्यायची का, असा प्रश्न पडतोच. पण इंधन दर वाढीमुळे सर्वसामान्य माणूस हैराण असला तरी ई- वाहनांची मागणी वाढली आहे.

*  केंद्र सरकारकडून इलेट्रॉनिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी प्रादेशिक परिवहन विभागातून नोंदणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे व्यापारी सांगतात.

*  ई- रिक्षा विक्री व्यवसायातील नितीन पवार म्हणाले,की पूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याएवढय़ा रिक्षा विक्री होत. ग्राहकांकडून विचारणा अधिक होत पण विकत घेण्याचा दर फारच कमी होता. इंधन दर वाढले  आणि आता रोखीने मालवाहतुकीसाठीच्या क्षेत्रातील मंडळी ई- वाहने घेत आहेत.

* साधी बॅटरी आणि लिथियम बॅटरी अशा दोन दर्जाच्या बॅटरी वापरल्या जातात. बॅटरी संपल्यावर ती पुन्हा वापरण्यासाठी लागणाऱ्या कालावधीवर आणि बॅटरीच्या आयुष्यमानावर ई-वाहनांचे दर असतात.

*  साधारणत: साध्या बॅटरीसाठी एक लाख ४५ हजार  आणि लिथियम बॅटरीसाठी एक लाख ९५ हजार रुपये लागतात. गेल्या काही दिवसात केवळ विचारणा करून परत न येणारा ग्राहक वाहन खरेदीसाठी परत येत आहे. हा नवा बदल इंधन दरवाढीच्या काळातील आहे.