बिपीन देशपांडे

सोळा वर्षीय ऋतुजाची उंची पाच फूट सहा ते सात इंच.  प्रकृती संरक्षण क्षेत्रात जाण्याला अनुकूल. संरक्षण क्षेत्रातील आव्हाने स्वीकारण्याची तयारी. तिचा कलही संरक्षण क्षेत्र निवडण्याकडेच. पण  पालकांची तशी इच्छा नाही. औरंगाबाद जिल्ह्यत ऋतुजासारख्या ५०० विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांचा कल संरक्षण क्षेत्राकडे जाण्याचा असल्याची माहिती घेतलेल्या कल चाचणीमधून समोर आली आहे.

सर्वच ठिकाणी दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची सध्या पुढील प्रवेशासाठी लगबग सुरू आहे. शाळा पातळीवर ऑनलाईन अर्ज भरण्यात येत आहेत. शाळेत घेतलेल्या कल चाचणीनुसार प्रवेशाची शाखा ठरवली जात आहे. मात्र, शाळेत झालेल्या कल चाचणीनंतर पालक पुन्हा एकदा खासगी समुपदेशकांकडून विद्यार्थ्यांचा कल आजमावून पाहात आहेत.

याबाबत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक क्षेत्रातील भवितव्याविषयी मार्गदर्शन, समुपदेशन करणारे येथील डॉ. संदीप सिसोदे यांनी सांगितले की, मागील महिनाभरात वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या साधारण एक हजार विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्यात आली. त्यातील जवळपास ५०० विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रात जायचे आहे किंवा आवडते क्षेत्र म्हणून संरक्षण विभागाकडे त्यांनी कल दर्शवला आहे.

मात्र, अनेक पालक हे संरक्षण क्षेत्राकडे विद्यार्थ्यांनी वळावे, यासाठी अनुकूल नाहीत. बहुतांश पालक हे विज्ञान क्षेत्राचा आग्रह धरताना दिसत आहेत.

सनिकी क्षेत्रामध्ये येण्याविषयी समुपदेशन करणारे राजेश पाटील यांच्या मते, केवळ वैद्यकीय, अभियांत्रिकी  ही दोनच क्षेत्रे मुलांचे भवितव्य घडवणारी नाहीत, तर अनेक क्षेत्रात भवितव्य घडवता येते. सन्यामध्ये विविध विभागात भरपूर जागा आहेत. त्या क्षेत्रात चांगल्या विद्यार्थ्यांची गरज आहे. अगदी अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण घेणाऱ्यांनाही सैन्याच्या विविध दलात काम करण्याची संधी आहे. मुलांना या क्षेत्रात यावे असे वाटत असेल आणि त्यासाठी सन्य दलातील नियमांचे काटेकोरपणे पालन करून शिक्षण घेण्याची तयारी असेल तर पालकांनीही मुलांच्या आवडीचा विचार करायला हवा.