विवाहितेच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबाद : केंद्र शासनाने तीन वेळा तलाक देण्याच्या प्रथेविरोधी कायदा मंजूर केल्यानंतर पहिला गुन्हा मंगळवारी शहरातील जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हुंडय़ासाठी सासरच्या मंडळींकडून छळ झाल्यानंतर माहेरी आलेल्या विवाहितेला तीन वेळा तलाक म्हणून पती निघून गेल्यानंतर पीडितेने जिन्सी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

नारेगाव येथील तरुणीचा २०१८ मध्ये शेख सलमान शेख लाल (वय २५) याच्यासोबत मुस्लीम रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. काही दिवस चांगले वागविल्यानंतर दोन लाख रुपये हुंडा आणण्यासाठी छळ केला जाऊ लागल्याचे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले. विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर सासरच्या मंडळीविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात छळाचा गुन्हा दाखल केला. विवाहितेच्या छळाला वेगळे वळण देण्यासाठी सासरा शेख लाल शेख युसूफ याने जिन्सी पोलीस ठाण्यात सून हरवल्याची खोटी तक्रार दिली. मात्र पोलीस चौकशीत ही बाब खोटी निघाल्याने सासरची मंडळी अडचणीत आली. त्यांनी जिन्सी पोलिसांसमोर चूक झाल्याचे कबूल करीत माफी मागितली आणि विवाहितेला नांदविण्याची ग्वाही दिली. विवाहिता सासरी जाताच सासरच्यांकडून छेडछाड होऊ लागली.

दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी पती सलमान याने पीडितेच्या माहेरच्यांना हुंडय़ात राहिलेले दोन लाख रुपये दिले तरच मुलीला नांदविण्यास नेईल. अन्यथा मुलीला तलाक देतो, असे धमकावले. काही वेळानंतर त्याने तीन वेळा तलाक म्हणून त्या ठिकाणाहून निघून गेला, असे पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.