ट्र कॉलर, ओएलएक्स, कस्टमर केअर, कॅटफिशिंगच्या माध्यमातून फसवण्याचे प्रकार दर दिवशी वाढत आहेत. विशेष म्हणजे फसवणाऱ्यांकडून सनिक, मोठय़ा उद्योजकांच्या नावे ट्र कॉलर, ओएलएक्स वापरून दूरध्वनी केले जात आहेत. औरंगाबादमध्ये अशा तक्रारी सायबर क्राइमसह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये येत असल्या तरी त्याची नोंद मात्र त्वरित घेतली जात नाही, अशी तक्रार काही फसवणूक झालेल्या व्यक्तींकडून केली जात आहे. बँकेकडूनही तक्रार अर्जच मागितला जात असल्याने फसवणूक झालेल्यांची मोठी कोंडी होत आहे.

दसऱ्याच्या पाश्र्वभूमीवर ऑनलाइन खरेदीदारांची वेगवेगळ्या माध्यमावर झुंबड उडत आहे. त्या माध्यमातून अनेकांची फसवणूकही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोनच दिवसांत अनेक प्रकार औरंगाबादेत घडले आहेत. विशाल नावाच्या व्यक्तीला जुन्यातली एक कार खरेदी करायची होती. ओएलएक्सवर पसंत केलेली कार एका सनिकाची असल्याचे त्याला समजले. त्याने त्या सनिकाशी संपर्क साधला. सनिकाने त्याचे आधारकार्ड, पॅनकार्ड, कॅन्टीनमधील खरेदीसाठीचे कार्ड व कारची अधिकृत नोंद असलेली कागदपत्रे विशालला पाठवली. मात्र जेव्हा विशालने सायबर क्राइममध्ये काम केलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला सर्व माहिती दिली तेव्हा सारा प्रकारच बनावट असल्याचे समोर आले.

भारती (नाव बदलले) या तरुणीला फसवण्यात आल्याचा प्रकार वेगळा आहे. तिने दसऱ्यासाठी म्हणून साडी, मुलांचे कपडे आदी ऑनलाइन खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्यात तिला ४० हजारांना फसवण्यात आले. कस्टमर केअरमधून प्रथमेश यांना गॅस सिलिंडरसाठी नोंदणी करायची होती. त्यांनी कस्टमर केअरचा क्रमांक मिळवला. त्यावर संपर्क साधला असता त्यांना सुरुवातीला ४५ रुपये भरण्यास सांगितले. ते त्यांनी भरले. त्यातून त्यांची काही माहिती काढून १८ हजार ६५० रुपये बँक खात्यावरून काढून घेण्यात आले. प्रथमेश यांना मिळालेला कस्टमर केअरचा क्रमांक बनावट निघाला. गॅस सिलिंडर नोंदणीसह खासगी बस वाहतुकीचे तिकीट नावे करणे, गुगल पे, ई-वॉलेटच्या माध्यमातूनही फसवण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. सायबर क्राइम शाखा मात्र तक्रार नोंद करत नसल्याचे काही फसवणूक झालेल्यांनी सांगितले.

यूपीआय क्रमांक सांगू नका

ऑनलाइन खरेदीच्या माध्यमात काही बनावट कंपन्या असून त्यांच्याशी व्यवहार करताना खरेदीदाराने पूर्ण सूचना, नियम पाळूनच पुढील पाऊल उचलावे. गुगल किंवा इतर कोणत्याही सर्च इंजिनवरून कस्टमर केअर आदींचे नंबर घेऊ नये. कस्टमर केअरचे क्रमांक संबंधित कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून घ्यावेत. तसेच यूपीआयचा पीन क्रमाक सांगू नका, असे सायबर क्राइमचे पोलीस निरीक्षक कैलास देशमाने आणि सहायक पोलीस निरीक्षक राहुल खटावकर यांनी सांगितले.

कॅटफिशिंगच्या माध्यमातून फसवणूक

कॅटफिशिंगच्या माध्यमातून विवाहविषयक संकेतस्थळ, फेसबुकच्या माध्यमातून काल्पनिक नाते संबंध बनवून किंवा विदेशातील महिलांच्या नावे पुढे करून गाठी-भेटीचे खोटे वचन देऊन अथवा भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले जाते. यातून फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत.