नवरात्र काळात भवानी रोड माग्रे राजे शहाजी महाद्वारातून भक्तांना दर्शन प्रवेश दिला जावा, या मागणीच्या आंदोलनानंतर संस्थानकडून सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी व संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाबरोबर मंगळवारी झालेली बठक निर्णयाविना गुंडाळण्यात आली. त्यामुळे तुळजापुरात पुन्हा एकदा निराशेचे वातावरण पसरले आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने शारदीय नवरात्र महोत्सव काळात भवानी रोड मार्गानेच यात्रा दर्शनासाठी सोडण्यासाठी बठक घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली होती. गृह राज्यमंत्री यांनी उपोषणप्रसंगी आश्वासन दिल्यानंतर ही बठक घेण्यात आली होती. यावेळी आमदार मधुकर चव्हाण, आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील, महंत मावजीनाथ बुआ, नगराध्यक्षा अ‍ॅड. मंजूषा मगर, तहसीलदार सुजित नरहिरे, व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांची उपस्थिती होती.

यावेळी आमदार मधुकर चव्हाण यांनी भवानी रोड मार्गावरूनच यात्रा मंदिरात गेली पाहिजे व ती का जाणे गरजेचे आहे, हे बठकीत सांगितले. परंपरा व पुजारी व्यवसायाला बाधा येणारी कृती होऊ नये. तुळजापूरकरांनी केलेल्या आंदोलनाचा व तुळजापूर बंदचा हवाला देऊन आपण जनतेच्या बरोबर आहोत, असे ते म्हणाले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी चार दिवसात याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावेळी सर्वाचे मत ऐकून घेऊन दहशदवाद विरोधी पथकाच्या निर्देशानुसार व विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या भेटीनंतर याबाबत निर्णय दिला जाईल, असे स्पष्ट केले.