सप्तमीदिवशी रात्री तुळजाभवानीचा छबीना उत्साहात झाला. आराधी, गोंधळी यांनी तुळजाभवानीची कवने गायली, तेव्हा सगळा परिसर भक्तीने फुलून निघाला. आई राजा उदो-उदो, सदानंदीचा उदो-उदोच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून निघाला. सप्तमीदिनी पितळी गरुड वाहनावर रोषणाई करून त्यावर चांदीचे सिंहासन बसविले होते. त्यात चांदीची देवीची मूर्ती बसविली होती.
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विधिवत पूजा केली. दरम्यान, गाभाऱ्यात महंत तुकोजीबुवा व महंत चिलोजीबुवा यांनी प्राक्षाळ पूजा केली. शहरातील पाच हजार पुजारी बांधवांनी गोमुखाच्या तीर्थाने प्राक्षाळ पूजा केली. छबीना मिरवणुकीत पेटलेले पोत घेऊन देवीचे नामस्मरण करणाऱ्या, तसेच भक्तीभावाने देवीच्या छबीन्यावर कुंकवाची उधळण करणाऱ्या हजारो भक्तांची या वेळी हजेरी होती. नगराध्यक्षा जयश्री कंदले, नगरसेविका डॉ. स्मिता लोंढे, विद्या गंगणे, अमर हंगरगेकर यांची उपस्थिती होती.
अष्टमीस भवानी तलवार अलंकार महापूजा
शारदीय नवरात्रामध्ये अष्टमीदिनी हजारो भक्तांनी छत्रपती शिवाजीमहाराजांना भवानी तलवार अलंकार महापूजा अनुभवली. सकाळी सात वाजता देवीची अभिषेक महापूजा झाली. दही-दुधाचा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर देवीच्या साजशृंगाराला सुरुवात झाली. त्यानंतर १२ वाजता धुपारती व अंगारा निघाला. आई राजा उदो-उदो, सदानंदीचा उदो-उदोच्या गजरात भक्तांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतले. दर्शन मंडपातील तीन सभागृहे भक्तांच्या गर्दीने खचाखच भरली होती. शहरातील इतर मार्गावर मात्र गर्दी दिसून आली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानीने आशीर्वाद म्हणून भवानी तलवार दिली. त्यानंतर शिवरायांनी िहदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांची कुलदेवता असणाऱ्या भवानीमातेस महाराजांनी सोन्याचा मुकुट व सोन्याची माळ अर्पण केली, असा उल्लेख देवीच्या अनेक दागिन्यांमध्ये दिसून येतो. ही देवता अनेक राजा महाराजांचीही कुलदेवता आहे.
तुळजाभवानी चांदीच्या सिंहासनावर शिवाजी महाराजांची चांदीची मूर्ती असून महाराज देवीसमोर नतमस्तक होऊन आशीर्वादाचा स्वीकार करीत आहेत. देवी त्यांना चांदीची तलवार भेट देत आहे. गुलाबी रंगाचा शालू देवीने परिधान केला असून उजव्या बाजूला किल्ला उभारला गेला आहे. हा देखावा पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून भक्तांची मोठी गर्दी दिसून आली.