दुष्काळाची दाहकता शेतकऱ्यांसह सामान्यांच्या मुळावर आली असतानाच वाहनदुरुस्ती, तसेच छोटय़ामोठय़ा वाहनांचे स्पेअर पार्ट्स विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनाही याचा मोठाच फटका बसला आहे. या व्यवसायातील दररोजची लाखोची उलाढाल आता अध्र्यावर घसरल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.
गेल्या तीन-चार वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे दुष्काळसदृश स्थिती आहे. यंदाही निसर्गाची अवकृपा मोठी असल्याने सर्व क्षेत्रातील आíथक उलाढाल लक्षणीयरीत्या मंदावली आहे. शेतीप्रधान देशातील अनेक भागांत ग्रामीण परिस्थिती भयावह बनली आहे. अपेक्षेइतके उत्पादन नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. शेतीतील उत्पन्न घटल्यामुळे वेगवेगळय़ा बाजारपेठांच्या अर्थकारणाला अनिश्चिततेने ग्रासले आहे.
दुष्काळाची दाहकता दुचाकी-चारचाकी वाहनांची दुरुस्ती करणाऱ्या, तसेच या वाहनांची स्पेअर पार्ट्स विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना सध्या अनुभवण्यास मिळत आहे. वाहनांचा अपेक्षित प्रवास होत नाही. एरवी शेतात चांगले पीक डोलू लागल्यानंतर शेतकरी पंढरपूर, काशी, तिरुपती बालाजी, कन्याकुमारी या देवस्थानांसह अन्यत्र फेरफटका मारतात. हे शेतकरी हॉटेल, लॉजकडे ढुंकूनही पाहात नाहीत. प्रवासात घरूनच अन्नधान्य नेऊन कुठल्या तरी शेतात शिजवून पोटाची पूजा करण्यातच धन्यता मानतात.
मात्र, यंदाही पावसाच्या अवकृपेने ग्रामीण भागातील असे दौरे पूर्ण मंदावले आहेत. परिणामी, वाहनांचा आवश्यक तो प्रवास न झाल्याने टायरची झीज होणे, छोटे-मोठे स्पेअर पार्ट्स बदलण्याची वेळच वाहनमालकांवर येत आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यापारी आनंदीदास देशमुख यांनी सांगितले, की त्यांच्याकडे व्हील अलायनमेंटसाठी रोज ३०-४० गाडय़ा येत होत्या. ही संख्या आता निम्म्यावर आली आहे. अशीच स्थिती छोटेमोठे स्पेअर पार्ट्स विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर ओढवली आहे.
ग्रामीण भागात पसा नाही, तर शहरी लोक गाडी उत्साहाने घेतात खरी, पण त्याची देखभाल करीत नाहीत. वेळच्या वेळी ऑइल, टायर व अन्य स्पेअर पार्ट्स बदलण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात, म्हणूनच अपघातांची संख्या वाढत आहे. शेतीचे उत्पादन चांगले झाले, तर वाहन क्षेत्राशी संबंधित सर्व व्यवसाय उत्तम चालतात. परंतु गेल्या चार वर्षांपासून हा व्यवहार प्रचंड मंदावला आहे. यंदा तर या क्षेत्रातील दररोज होणारी लाखोंची उलाढाल अध्र्यावर आली आहे. पसा नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोक वाहन खरेदी करीत नाहीत. जुन्या वाहनांचा वापर म्हणावा तेवढा होत नाही, म्हणूनच वाहनांची दुरुस्ती किंवा स्पेअर पार्ट्सची विक्री असेल ती प्रचंड मंदावल्याचे देशमुख यांनी सांगितले.
वाहनदुरुस्ती, छोटय़ा-मोठय़ा स्पेअर पार्ट्सची विक्री यासोबतच या क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी आपल्या विक्री प्रतिनिधींच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर कपात केल्याचे चित्र आहे. त्यामुळे नवीन एखादे उत्पादन बाजारात आले तर त्याचे आवश्यक ते विपणनही होत नाही. त्यामुळेही वाहनमालकांच्या उदासीनतेत भर पडत आहे. निसर्गाची कृपा वा शेतीतील उत्पादन वाढणार नाही, तोपर्यंत या व्यावसायिकांना आíथक मंदीचा फटका बसणार आहे. तरोडा नाका परिसरातील दुचाकी दुरुस्ती करणारे मुश्ताक यांनी सांगितले, की त्यांच्याकडे नियमित वाहनदुरुस्ती करणाऱ्या वाहनांची संख्या २५ ते ३० होती, ती आता निम्म्यावर आली आहे. काही काही दिवशी तर एकही वाहनदुरुस्तीस येत नाही. ग्रामीण भागात दुचाकीस्वार वाहनदुरुस्तीबाबत अत्यंत सजग असतात, पण आता त्यांची इच्छा असूनही ते जोपर्यंत काम अडणार नाही तोपर्यंत दुरुस्तीच्या भानगडीत पडत नसल्याचे चित्र आहे.