दुकाने उघडू देण्याची व्यापाऱ्यांची शासनाकडे मागणी

औरंगाबाद : करोनाकाळात लादलेल्या टाळेबंदीमुळे आणि दुसऱ्या लाटेतील निर्बंधांमुळे तयार कपडय़ाचे दर वाढण्याची शक्यता आहे. करोनामुळे वस्त्रोद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. काही व्यावसायिकांची उलाढाल  ३५ ते ४० टक्क्यांनी घटली आहे. प्रत्येक व्यवसायानुरूप नुकसानीचे आकडे थोडेफार कमी होत असले तरी उलाढाल घटली असल्याचे लेखा परीक्षणांमधून दिसून येत असल्याचे लेखापरीक्षक संघटनेचे रोहन आचलिया यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. येत्या काही महिन्यात महागाई अधिक वाढेल, असे सांगण्यात येत असून आता दुकाने उघडू द्या, अशी निवेदने व्यापाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहेत.

करोनाकाळात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन टाळेबंदी सदृश नियम व्यापाऱ्यांनी पाळले. पण आता अनेक व्यवसाय डबघाईस आलेले आहेत. आर्थिक घडी नीट बसविण्यासाठी १ जूननंतर दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. एवढे दिवस आम्ही सहकार्य केले, आता प्रशासन म्हणून तुम्ही करा, असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी केले आहे. दुसऱ्या लाटेनंतर अनेक व्यावसायिकांची उलाढाल ठप्प झाली आहे.  गेली ३९ वष्रे कपडय़ाचा व्यवसाय करणारे प्रवीण साहुजी म्हणाले,‘ गेली चार वष्रे अडचणीची होती. नोटाबंदीमुळे बाजारपेठ तशी थंडच होती. त्यानंतर जीएसटी सुरू झाला. पण तेव्हा काही ना काही उलाढाल सुरू असे. करोनामुळे गेल्या वर्षी चार महिने आणि आता दोन महिन्यापासून सारे ठप्प आहे. दिवाळीच्या काळात जी काही उलाढाल झाली तेवढेच. पण सर्व व्यापारी हैराण आहेत.  अगदी पूर्ण वेळ  नाही, तर किमान दोन-चार तास तरी दुकाने उघडण्यास परवानगी द्यायला हवी. अन्यथा सारे काही अवघड होऊन बसेल. ’

रुग्णसंख्या आता कमी होत असून महापालिका क्षेत्रातील आकडा शंभराच्या आत आला आहे. त्यामुळे दुकाने उघडण्यास परवानगी मागितली जात आहे. प्राधान्यक्रमाच्या किराणा, औषधी या दुकानांबरोबरच कपडा, इलेक्ट्रॉनिक वस्तू, यासह विविध वस्तूंची दुकाने उघडी करण्यास परवानगी देण्याची गरज आहे. आता नागरिकांनाही हा विषाणू किती धोकादायक आहे, हे कळून चुकले असल्याने तेही काळजी घेतील. त्यामुळे कोविड नियमांचे पालन करून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी होत आहे.

विविध व्यावसायिकांचे ताळेबंद तपासताना सरासरी होणारी  उलाढाल ३५-४० टक्के कमी झाल्याचे दिसून येते आहे. काही व्यवसायातील उलाढाल ७५ टक्क्यांपर्यंतही घसरली आहे. हा तोटा भरून काढण्यासाठीचे प्रयत्न होतील, तेव्हा साहजिकच किमती वाढतील. त्यामुळे पुढील वर्ष महागाईचे असू शकेल.

– रोहन आचलिया, लेखा परीक्षक संघटना

आता दुकाने उघडल्याशिवाय पर्याय असणार नाही. आता रुग्णसंख्याही कमी झाली आहे. येत्या काळात संसर्ग वाढत गेला तर प्रशासनाला पुन्हा सहकार्य करू पण आता एक जूनपासून निर्बंध उठवावेत, या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे.

जगन्नाथ काळे, अध्यक्ष व्यापारी महासंघ