बिपीन देशपांडे

अवघे २५ रुपये महिन्याकाठी जमा करणाऱ्या बचतगटाकडून एका महिला सदस्याने सातशे रुपयांचे कर्ज घेतले आणि तेवढय़ा पैशातून खरेदी केलेल्या साधारण प्रकृतीच्या शेळीपासून सुरुवात झालेला दुग्धव्यवसाय १६५ म्हशींच्या माध्यमातून विस्तारत नेला. या म्हशींपासून दररोज अकराशे लिटर दूध निघते. दूध-दुग्धजन्य पदार्थ, शेण खत विक्रीतून होणारी वार्षिक उलाढाल आज एक कोटींपर्यंतची आहे. एखाद्या रुजवण केलेल्या बीजातून वटवृक्ष कसा होतो याचे हे दृश्यमान लाडगावात पाहायला मिळेल. विमल नारायणराव इथ्थर यांचा श्वेतक्रांती म्हणून पाहावा, असा प्रवास उद्बोधकच आहे.

औरंगाबाद-जालना महामार्गावर हे लाडगाव आहे. शहरापासून अवघ्या १८-२० किलोमीटरवर. गावात विमलबाई सर्व परिचित. दुधाच्या व्यवसायातून भरभराट झालेले त्यांचे कुटुंब. २५ ते ३० वर्षांपूर्वी त्यांना अवघी दीड एकर जमीन होती. खटलं (कुटुंब) मोठं होतं. यजमान चालक म्हणून एका कंपनीत नोकरी करायचे. फिरस्तीचेच काम त्यांचे. कुटुंबाकडे लक्ष देण्यासारखी परिस्थिती नव्हती. मुलांची आबाळ होते, त्यांना दूध मिळत नाही, म्हशीचे दूध रतिबाने लावण्यासारखी परिस्थिती नाही, असे वाटणाऱ्या विमलबाईंच्या मनात संसाराचे चित्र बदलण्याचे विचार घोळू लागले. पै-पै जमवण्याचे ठरवले असताना गावात एकदा विजय अण्णा बोराडे यांनी काही महिलांना एकत्र करून बचतगट सुरू करण्याची सूचना केली.

बचतगटासाठी  विमलबाई दरमहा २५ रुपये जमा करू लागल्या. २५ वर्षांपूर्वीची ही रक्कम. विमलबाईंना शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी शेळीसारखा प्राणी घ्यावा, असे विचार येऊ लागले. बचतगटाकडून सातशे रुपयेच कर्ज मिळू शकणारे होते. पण शेळीसाठी हजार-बाराशे तरी रुपये लागतील, असे त्यांना सांगण्यात आले. काही रक्कम इतरांच्या शेतात मजुरी करून जमा करण्याचा निश्चय विमलबाईंनी केला.

पण सातशे रुपयांतच अगदीच साधारण प्रकृतीची शेळी त्यांना मिळाली.

दुग्ध व्यवसायातून झालेल्या भरभराटीचे सारे श्रेय नारायणराव इथ्थार हे विमलबाईंनाच देतात. ‘शेळीच्या रुपात विमलबाईंना धन सापडले आणि विमलबाईंच्या रूपात आम्हाला,’ असे नारायणराव खुलेपणाने सांगतात. नारायणरावांचा दिवस पहाटे ३.३० वाजता सुरू होतो. प्रत्येक म्हशीवर तिचे खाद्य, दूध, शेणादी पाहण्यासाठी त्यांच्याकडे काही मजूरवर्ग आहे. त्यांच्यावरील जबाबदारी पार पडते की नाही, हे ते पहाटे उठूनच पाहतात. एक मुलगा दूध शहरात पोहोचवतो तर दुसरा हिशोब पाहतो.

‘दररोज सकाळ-दुपारी मिळून अकराशे ते साडे अकराशे लिटपर्यंत दूध निघते. म्हशींना वेळेचा काटेकोरपणा जपत उत्तम चारा, खाद्य दिले जाते. अंतर्बाह्य़ स्वच्छताही राखली जाते. जाफरी आणि नुरा, अशा म्हशी गोठय़ात असून शेण खत, दुधाला लिटरमागे मिळणारा ६०-६५ रुपयांपेक्षाही अधिकचा दर आदीतून होणारी वार्षिक उलाढाल ही एक कोटींच्या आसपास आहे,’ असे नारायणराव सांगतात.

पशु हे धनच : दुग्ध व्यवसायातील प्रवास सांगताना विमलबाईंचे डोळे त्या शेळीच्या आठवणीने पाणावले. ‘त्या शेळीला जिवापाड जपले. लक्ष्मी म्हणूनच. अखेपर्यंत तिला विकले नाही. पिलं विकली. शेळी गेली तेव्हाही तिचा अंत्यविधी माणसांप्रमाणेच विधिवत केला. पशु हे धनच आहे, यावर आपला विश्वास आहे. तेथून एक म्हैस, पुन्हा पाच-सात-२५-५० असे करत-करत आज १६५ म्हशी झाल्या आहेत. स्वत: मी, मालक, दोन्ही तरुण मुलं आम्ही सर्व प्रत्येक म्हैस, प्राण्याला जपतो,’ विमलबाई सांगत होत्या.