News Flash

पोलीस ठाण्यातील मृत्यूप्रकरणी दोन हवालदार बडतर्फ

वाहन चोरी प्रकरणात कबुली जबाब घेण्यासाठी केलेल्या मारहाणीत ३७ वर्षीय आरोपीचा मृत्यू झाला होता.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

न्यायालयीन कस्टडीत असताना ३७ वर्षीय आरोपीचा परभणी जिल्ह्य़ात नानलपेठ पोलीस ठाण्यातील मृत्यू प्रकरणात गुन्हा नोंदण्यात आलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे. मुख्य हवालदार तुळशीदास देशमुख आणि हवालदार शेख मुस्ताक अशी या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. नानलपेठ पोलीस ठाण्यातील आरोपीच्या मृत्यूनंतर राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक शेख रौफ व तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले होते.

वाहन चोरी प्रकरणात कबुली जबाब घेण्यासाठी केलेल्या मारहाणीत ३७ वर्षीय आरोपीचा मृत्यू झाला होता. २५ डिसेंबर २०१६ रोजी घडलेल्या या घटनेनंतर राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने चौकशी केली आणि गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे दोन हवालदार ‘गायब’ होते. फरार आरोपी गुन्ह्य़ाच्या तपासात मदत करत नसल्याचे दिसून आल्याने त्यांना नोकरीवरून कमी करण्याची कारवाई करण्यात आले. परभणी पोलीस अधीक्षकांनी या वृत्तास दुजोरा दिला.   राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने पोलीस निरीक्षक शेख रौफ अब्दुल रौफ यास अटक केली असून तीन महिन्यांपासून तो गजाआड आहे. आरोपीला अटक करताना केलेल्या नोंदीही चुकीच्या असल्याचे दोषारोप पत्रात नमूद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 1:04 am

Web Title: two constables sacked in connection with the death in police station
Next Stories
1 विद्यार्थ्यांची बोगस नोंद करून फसवणूक
2 पितृछत्र हरवलेल्या मुलीचा लोकसहभागातून पार पडला विवाह
3 औरंगाबादमधील कटकटगेट भागात तरुणाची आत्महत्या
Just Now!
X