दोन कोटी खात्यांमध्ये प्रत्येकी दोन ते पाच हजार जमा

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>

बँक खात्यातील १५ लाख रुपये हा ‘जुमला’ असला तरी जन-धन खात्यात सध्या ‘सुख’ आले आहे. बहुतांश जन-धन खात्यात रक्कम नसेल तरीही काही बँकांनी पाच हजार, तर काही बँकांनी दोन हजार रुपयांच्या रकमा जन-धन खात्यात जमा केल्या आहेत.  मात्र, ही रक्कम कर्ज स्वरुपात असून त्यावर १३ टक्के व्याजदर आकारला जातो. तसेच रक्कम काढण्यासाठी खात्याचा पूर्वइतिहासही तपासला जातो. सहा महिन्यांत किमान चारवेळा व्यवहार हवा किंवा पाच हजार रुपयांपर्यंतचा व्यवहार, असा निकष आहे.

राज्यात दोन कोटी २१ लाख ३९ हजार ६०५ जन-धन खाती उघडण्यात आली होती. ठाणे, नाशिक या जिल्ह्य़ांमध्ये १४ लाखांहून अधिक जन-धन खाती उघडण्यात आली. तर वर्धा जिल्ह्य़ात सर्वात कमी दोन लाख १८ हजार १४२ खाती उघडण्यात आलेली होती. यापैकी शून्य शिलकीची खाती ५५ लाख ९३ हजार ५९७ एवढी होती. त्यात चार हजार ४९१ कोटींची बचत जमा होती. आता नव्याने जन-धन खाते असणाऱ्या लाभार्थ्यांला तातडीने रक्कम मिळू शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. काही बँकांनी रक्कम खात्यात जमा करण्यास टाळाटाळ केली होती. त्यांनाही रक्कम देण्याचे निर्देश देण्यात आले आणि आता बँकांकडून जन-धन खात्यात रक्कम दिली जात आहे.दुष्काळी भागातील काही जन-धन खात्यातून पूर्वी ५०० रुपयांपर्यंतच्या रकमा एटीएमद्वारे काढण्यात आल्या होत्या.  ही रक्कम कर्ज म्हणून गृहीत धरली गेल्याने काही खाती एनपीएमध्ये गेली होती. आता रकमेची मर्यादा १० हजारांपर्यंत नेण्यात आली आहे आणि वाटप दोन ते पाच हजार रुपयांपर्यंतचे झाले आहे.

झाले काय?

केंद्रीय अर्थसंकल्पात जन-धन खात्यात रक्कम नसली तरी त्या खातेदारास पाच हजार रुपयांपर्यंत बँक व्यवस्थापकाच्या परवानगीने रक्कम उचलता येत होती. त्यात वाढ करण्यात आली आहे. मात्र, बहुतांश खातेदारांना या सवलतीचा लाभ मिळत नव्हता. आता मात्र रक्कम जमा करण्यात आली आहे.  बँकांकडून  दोन ते पाच हजार रुपयांची रक्कम जमा होत असल्याचे संदेश खातेदाराच्या भ्रमणध्वनीवर पाठविण्यात आलेला आहे.