इंग्लंड, अमेरिका, जपान आदी देशांमध्ये उपळा आणि पाडोळी या नावाने जरबेरा फूल आढळून आल्यास आता नवल वाटू नये, याचे कारण उस्मानाबाद तालुक्यातील उपळा आणि पाडोळी या नावाने पोर्तुगालमध्ये जरबेरा फुलाचे वाण विकसित करण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील जरबेराची शेती जागतिक बाजारपेठेत आपली नवीन ओळख निर्माण करण्यास आता सज्ज झाली आहे. शुक्रवारी मोठय़ा उत्साहात पाडोळी येथे उपळा आणि पाडोळी या फुलांच्या नामकरणाचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे होते. गुजरातचे कृषितज्ज्ञ खासदार दीपसिंह राठोड, पोर्तुगाल देशातील मोन्टीप्लान्ट कंपनीचे सीईओ डेव्हीड यार्कोनी, माजी खासदार डॉ.पद्मसिंह पाटील, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य अॅड. मिलिंद पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी यार्कोनीसाठी इंग्रजीमध्ये, तर खासदार दीपसिंह राठोड यांच्यासाठी िहदीमध्ये आणि पाडोळीकरासांठी मराठीत या प्रमाणे तीन भाषांमध्ये भाषण केले. जिल्ह्यात २ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना १६ हजार ४०० शेतकरी गट करून उत्पन्नाचे साधन निर्माण केले. जरबेरा फुलशेती प्रमाणेच दुधाचे उत्पादन, उस्मानाबाद शेळी, अन्न प्रक्रिया उद्योग चालू करून कृषी गटाचे व्यवसायात रूपांतर करून चार पसे मिळविण्यासाठी घराघरातून आंदोलन करण्याची गरज आहे. कोणापुढेही शेतकऱ्यांना हात पसरण्याची गरज राहणार नाही, असे नारनवरे यांनी सांगितले. खासदार राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे, जलयुक्त शिवार व फुलशेती वाढविण्याचे केलेल्या कामाचे कौतुक केले.
डेव्हीड यार्कोनी यांनी, पोतुर्गालपेक्षा उपळा व पाडोळीमधील जरबेरा फुलाचे उत्पादन जास्त होत आहे. दोन्हींकडील हवामान सारखे असले, तरी नेमके कशामुळे उत्पादन जास्त होत आहे, याची माहिती घेण्यासाठी आपण यापूर्वी आलो होतो. तेव्हापासून आपला पाडोळीशी संबंध आहे, असे सांगितले. पाडोळी आणि उपळा जरबेरा फुलाचे रोप अमेरिका, जपान व पूर्ण आशिया खंडात जाणार आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर या दोन्ही गावांचे नाव गेले आहे. पाडोळी आणि उपळा जरबेरा फुलांची गुणवत्ता कायम टिकवून सरकारने कुलिंग हाऊस व कूलिंग वाहतुकीची सोय करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पॉलीहाऊसला सोलर एनर्जीशी जोडल्यामुळे नसíगक शक्तीचा चांगल्या प्रकारे वापर होत आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. पद्मसिंह पाटील, अॅड. मििलद पाटील, अॅड. अमोल रणदिवे यांची भाषणे झाली. बालाजी पवार यांनी प्रास्ताविक, तर अजित पवार यांनी सूत्रसंचालन केले. जरबेरा फुलशेतीचे जनक मनोज पडवळ, संजय पवार, सतीश एकंडे, बालाजी पवार यांचा सत्कार करण्यात आला.