उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका

औरंगाबाद : काँग्रेसचे नेते आश्वासन दिल्यानंतर प्रिटिंग मिस्टेक आहे असे सांगायचे आणि यांची ‘जुमलेबाजी’.. फरक काय दोघांमध्ये, असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांची अलिकडची वक्तव्ये निर्लज्ज आणि कोडगेपणाची होती, अशी टीका औरंगाबाद येथे केली. ते शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते. गडकरींबरोबरच नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचीही त्यांनी हजेरी घेतली. गटप्रमुखांच्या मेळाव्यात एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि पुतळा होता आणि दुसऱ्या बाजूला प्रभू रामचंद्राची प्रतिमा आणि प्रतिकृती होती. राम मंदिर हा मुद्दा शिवसेनेना आता उचलला असल्याचे दर्शनीय रूप या मेळाव्यात स्पष्टपणे दिसत होते.

बाळासाहेब ठाकरे हे स्पष्टवक्ते होते. तुम्ही जे बोलता आहात, त्याला स्पष्टवक्तेपणा म्हणत नाही. गडकरी मध्यंतरी म्हणाले, ‘आम्हाला म्हणे विश्वास होता, आमचे सरकार काही येत नाही. त्यामुळे लोक आम्हाला सांगत होते, द्या आश्वासने. जबाबदारी येणारच नाही, त्यामुळे बोला खोटे’ असे सांगितले जात होते आणि तुम्हीही आश्वासने देत गेला. पण तो तुम्ही जे म्हणालात त्याला स्पष्टवक्तेपणा म्हणत नाही. तर तो निर्लज्जपणा आणि कोडगेपणा आहे, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींवर टीका केली. केंद्रांच्या योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपकडून पूर्वी निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या प्रचाराचे मुद्दे ‘जुमला’ होते का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. काश्मीरसाठी लागू असणारे ३७० कलम, समान नागरी कायदा याबरोबरच राममंदिर हासुद्धा जुमला आहे का, हे एकदा सांगाच, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारण्यासाठी अयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुत्वासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असे सांगायलाही ठाकरे विसरले नाहीत.