मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंची उपस्थिती, खोतकरांच्या भूमिकेकडे लक्ष

शिवसेना-भाजप युतीच्या घोषणेनंतर दोन्ही पक्षांतील स्थानिक पातळीवरील वाद आणि नेत्यांमधील तेढ कमी करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. श्रीहरी पॅव्हेलियन येथे होणाऱ्या या मेळाव्यात अर्जुन खोतकर यांच्या बंडाबाबतचा निर्णयही जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबईत शनिवारी खोतकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जालना लोकसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी मागणी केली. मात्र, याबाबतचा निर्णय होऊ शकला नाही. रविवारच्या मेळाव्यात याबाबत स्पष्ट संकेत मिळतील.

युती झाल्यानंतर मराठवाडय़ात पहिल्यांदाच एकत्रित दौरा करणाऱ्या नेत्यांसमोर आपापल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी काहीजण सरसावले आहेत. विशेषत: भाजपचे काही नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या कार्यशैलीवर वैतागलेले होते. पत्रकार बैठका घेऊन खासदार खैरे हे कसे निष्क्रिय आहेत आणि त्यांच्यामुळे औरंगाबाद शहरातील अनेक प्रकल्प कसे रखडले आहेत, अशी टीका केली जात होती. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, पक्ष प्रवक्ते शिरीष बोराळकर, आमदार अतुल सावे हे खासदार खैरे यांच्यावर टीका करण्यात अग्रेसर असत. उद्या होणाऱ्या मेळाव्यापूर्वी भाजपनेते मुख्यमंत्र्यांशी या अनुषंगाने बोलतील, असा अंदाज आहे. खासदार खैरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारासाठी नाही तर भाजपला केंद्रात यश मिळावे म्हणून शिवसेनेचे काम करू, असे सांगण्यात येत होते. खासदार खैरे यांच्याविषयीची नाराजी भाजपकडून सातत्याने दाखविण्यात आली आहे. त्यांनी प्रचार कार्यालयाच्या कलश पूजनाच्या वेळीही भाजप कार्यकर्ते गैरहजर होते.

तिढा कायम

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अद्यापही औरंगाबाद आणि जालना या दोन्ही ठिकाणी उमेदवार ठरविता आलेले नाही. जागांचा तिढा न सुटल्याने प्रतिस्पर्धी उमेदवार कोण, हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे अंतर्गत मतभेद कमी करण्यास कोणते उपाय सुचवले जातात, याची उत्सुकता आहे. विशेषत: जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना आणि काँग्रेसची युती आहे. या युतीबाबत शिवसेनेकडून कोणती भूमिका घेतली जाते, असा सवाल भाजपचे कार्यकर्ते वारंवार विचारत होते. उद्याच्या मेळाव्यानंतर या प्रश्नाचे उत्तर मिळेल, असा दावा केला जात आहे. दरम्यान, मराठवाडय़ातील शिवसेनेच्या काही उमेदवारांच्या नावावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. यात उस्मानाबादचाही समावेश आहे. अद्यापि उस्मानाबादच्या जागेचा तिढा शिवसेनेला सोडवता आलेला नाही.