केंद्र सरकारकडून पाणीपुरवठा योजनांसाठी निधी दिला जात नाही, त्याचे कारण काय, यासह दुष्काळाच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांना बगल देत केंद्रीय ग्रामविकासमंत्री बीरेंद्रसिंग चौधरी यांनी पत्रकार बैठक गुंडाळली. तुमच्या प्रश्नांना तुम्हाला हवी तशी उत्तरे देता येणार नाहीत, असेही ते म्हणाले. पत्रकार बैठकीत ४५ मिनिटांहून अधिक वेळ केंद्र सरकार चांगले काम करीत असल्याचा दावा करणाऱ्या बीरेंद्रसिंग यांनी प्रश्नांची उत्तरे देण्यास फारसा वेळ न देता काढता पाय घेतला.

मोदी सरकारला दोन वष्रे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात ३३ चमू तयार करून विविध ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांना केलेल्या कामाची माहिती देण्यास पाठविले असल्याचे बीरेंद्रसिंग यांनी सांगितले. पंतप्रधान ग्रामसडक योजना, जनधन योजना, आवास योजना यामुळे देशात चांगले वातावरण निर्माण होत असल्याचा दावा केला. राष्ट्रीयीकृत बँकांना सरकार मदत करण्यास तयार असल्याच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या वक्तव्याचा हवाला देत त्यांनी सांगितले.

निवेदनानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेबाबत त्यांनी केलेल्या दाव्यातील फोलपणा पत्रकारांनी त्यांच्या लक्षात आणून दिला. त्यावर ‘मागणीच होत नसेल तर काम कसे होणार? ही योजना ग्रामीण भागातून होणाऱ्या मागणीवर आधारलेली आहे’ असे बीरेंद्रसिंग यांनी सांगितले. मात्र, ऐन दुष्काळातही रोजगाराची मागणी होत नसते काय?, पाच हजार गावांमध्ये मागणी होत नाही म्हणणे किती योग्य ठरते, असा प्रश्न केला असता या योजनेतील मनुष्यतास वाढविण्यात यश आल्याचा दावा बीरेंद्रसिंग यांनी केला. राष्ट्रीय पेयजल योजना निधीअभावी बंद आहे. त्याची तरतूद होत नाही, याची कारणे काय, असे विचारले असता राज्यात पिण्याच्या पाण्यासाठी मोठय़ा योजनांसाठी आंतरराष्ट्रीय संस्थांकडूनही निधी देता येईल, असे ते म्हणाले.

पाण्याची पातळी खोल गेली असल्याने अनेक प्रकारचे आजार उद्भवत आहेत. त्यावर मात करण्यासाठी ग्रामविकास खाते पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पंजाबसारख्या राज्यात आर्सेनिकसारखे घातक पदार्थच नव्हे तर आण्विक पदार्थही दूषित पाण्यात आढळले असल्याचे अहवाल केंद्र सरकारकडे आल्याचे ते म्हणाले. मात्र, दुष्काळ, पाणी योजना, विमा योजना यावर त्यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने पत्रकार बैठकीस उपस्थित असणारे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बाजू सावरून धरण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषदेत नाना प्रश्न उपस्थित होतील, असे चित्र दिसताच भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी मोजकेच प्रश्न विचारा, असा सूर लावला. त्यांच्याकडे वेळ नाही, एका सभेला केंद्रीय मंत्र्यांना जायचे आहे, असे सांगत पत्रकार बैठक गुंडाळण्याचा प्रयत्न केला. शेवटी लोकांचे प्रश्न आहेत, दुष्काळग्रस्त भागातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील, असे सांगितल्यानंतर मोजक्या प्रश्नांवर बोलू, अशी भूमिका बीरेंद्रसिंग यांनी घेतली. पत्रकार बैठकीस भाजपचे आमदार अतुल सावे यांची उपस्थिती होती.