अ‍ॅपमध्ये त्रुटी ठेवणारी कंपनी मोकळीच; ग्राहकांवर गुन्हे

यूपीआय या अ‍ॅपच्या माध्यमातून बँकांची होणाऱ्या लुटीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून सर्व बँकांचा मिळून हा घोळ ७५ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असताना पोलीस आणि बँक अधिकाऱ्याकडून दिल्या जाणाऱ्या तक्रारी ‘चोर सोडून..’ या म्हणीप्रमाणे असल्याचे काही बँक अधिकारी सांगत आहेत. बंद खात्यातून काढण्यात आलेली रक्कम यूपीआय अ‍ॅप तयार करणाऱ्या इन्फ्राटेक कंपनीचा दोष असल्याचे सांगण्यात येते. या कंपनीने तयार केलेल्या अ‍ॅपमध्येच सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेतली गेल्या नसल्याने प्रश्न निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

बंद खात्यातून रक्कम निघाली कशी, असा सवाल केला जात आहे. खात्यामध्ये पैसे नसताना जर बँकेने धनादेश मंजूर केला त्याची जबाबदारी ग्राहकावर लादली जात नाही. ज्यांनी यूपीआय अ‍ॅप वापरला किंवा ज्यांच्या भ्रमणध्वनीवरून या अ‍ॅपचा वापर केला गेला अशा ८४ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. वास्तविक कार्यपद्धतीमधील उणीव असल्याने असा घोटाळा करता आला. ज्यांनी अ‍ॅप बनविले त्या कंपनीवर मात्र कोणतीही कारवाई  करण्यात आली नाही. नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून देण्यात आलेल्या रकमा बंद खात्यातून कशा दिल्या गेल्या, यावर कोणीच काही बोलायला तयार नाही. ज्या खात्यामध्ये पैसे नव्हते त्या खात्यातून रक्कम निघणार नाही, अशी व्यवस्था अ‍ॅपमध्ये असण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे झाले नाही.

बंद खात्यातून मिळालेली रक्कम ज्यांना मिळाली त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असले, तरी ही रक्कम ज्या अ‍ॅपच्या त्रुटीमुळे निघाली ते अ‍ॅप तयार करणारी कंपनी व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनपर्यंत मात्र या गुन्हय़ाचा तपास जात नसल्याने ‘चोर सोडून..’ गुन्हे दाखल होत असल्याचे बँकेतील विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येते.