औरंगाबाद : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीचे सादरीकरण असणारी कागदपत्रे एका प्लास्टिकच्या वेष्टनात गुंडाळून देणाऱ्या नियोजन विभागाचे उपायुक्त रवि जगताप यांना पाच हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई महापालिका आयुक्तांनी केली आहे. प्लास्टिक वापरावर बंदी असताना सरकारी अधिकाऱ्यांनीच वापरलेले प्लास्टिकचे फोल्डर शासन निर्णयाच्या विरोधात असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. पाच हजार रुपये दंडाची पावती घनकचरा विभागाचे जयवंत कुलकर्णी यांनी उपायुक्त रवि जगताप यांना दिली आहे.

अलीकडच्या काळात सरकारी कार्यालयातून होणारा प्लास्टिकचा वापर बंद व्हावा म्हणून महापालिकेच्यावतीने अशा कारवाया केल्या जात असून रुजू झाल्यानंतर आपल्याच अधीनिस्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरही महापालिका आयुक्तांनी कारवाई केली होती. अगदी पहिल्या दिवशी रुजू झाल्यानंतर प्लास्टिकच्या वेष्टनात गुंडाळलेला पुष्पगुच्छ घेऊन येणाऱ्या अधिकाऱ्यावरही त्यांनी कारवाई केली होती. आज विभागीय आयुक्त कार्यालयातील वरिष्ठांना त्यांचा दणका बसला.