त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि. ल. धारुरकर यांनी अखेर शनिवारी राजीनामा दिला. डॉ. धारुरकर यांचे कथित लाचप्रकरण एका चित्रफितीद्वारे समाजमाध्यमावर प्रसृत झाल्यानंतर डॉ. धारुरकर यांनी राजीनामा दिला आहे.

धारुरकर हे विद्यापीठातील छपाईच्या संदर्भातील ६० लाखांच्या कंत्राटापोटी लाच स्वीकारत असल्याची चित्रफीत पसरवण्यात आली होती. त्रिपुरातील ‘व्हॅनगार्ड न्यूज’ या स्थानिक वृत्तवाहिनीने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये धारुरकर हे लाचेच्या रकमेसंदर्भात बोलत असल्याचे दिसत आहे. संबंधित चित्रफीत बनावट असल्याचा दावा डॉ. धारुरकर यांच्याकडून करण्यात आला. मात्र कथित लाचप्रकरणाची देशभर चर्चा सुरू झाल्यानंतर आणि या संदर्भातील तक्रार दाखल झाल्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून धारुरकर यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती आहे. शनिवारी धारुरकर यांनी  राजीनामा दिला आहे.

डॉ. वि. ल. धारुरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिलेले आहे. स्थानिक अनेक नामांकित महाविद्यालयातही त्यांना अध्यापनासाठी निमंत्रित केले जायचे. ५ जुलै २०१८ रोजी त्यांची त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. धारुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडय़ात अनेकांनी पीएच.डी. केलेली आहे. या पीएच.डी. प्रकरणावरही आता संशय व्यक्त करण्यात येत असून धारुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या शोधनिबंधांचीही चौकशी करावी, अशीही मागणी आता काही संघटनांकडून पुढे येत आहे.