दोन लाख २४ हजार जणांचे लसीकरण पूर्ण

औरंगाबाद : नव्याने आलेला २५ हजार लशींची मात्रा बुधवारी संपल्यानंतर नव्याने सव्वा लाख लसींची मात्रा द्यावी, अशी मागणी महापालिकेने केली आहे. आतापर्यंत दोन लाख २४ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असून लस संपल्याने गुरुवारी लसीकरण बंद राहील, असे महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडाळकर यांनी सांगितले.

करोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम जोमात सुरू असून लसीकरणासाठी रांगाही लागत आहेत. पण  लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्यास करण्यात आलेल्या विलंबामुळे अनेक जण हैराण आहेत. पहिली मात्रा घेतल्यानंतर लघुसंदेश नसल्याने बाहेरगावी गेलेल्या व्यक्तींना दुसरी मात्रा घेण्यास अडचणी जाणवत आहेत. दरम्यान, शहरातील बहुतांश लसीकरण केंद्रावर गर्दी होत असून गेल्या दोन दिवसांत तर लसीकरणाला मोठा वेग देण्यात आला. २५ हजार लशीचा साठा अवघ्या दोन दिवसांत संपल्यामुळे मनपाने आरोग्य विभागाकडे सव्वा लाख लस देण्याची मागणी केली आहे.

शहरात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्याने घराघरात बाधित रुग्ण आढळून येत आहे. दररोज सरासरी आठशे ते हजार जणांना करोना संसर्ग होत आहे. अनेक उपाय केल्यानंतर रुग्णवाढीचा वेग काहीसा आटोक्यात आल्याचे चित्र दिसत असून करोना निर्मूलनासाठी लसीकरण हेच प्रभावी माध्यम असल्याने तेच धोरण महापालिकेनेही ठरविले. ११५ वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येऊ लागली. ५ एप्रिलपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. सोमवारी ११ हजार ६२१ नागरिकांनी तर मंगळवारी देखील १० हजार ५३ नागरिकांनी लस घेतली.

लस संपल्यामुळे दुपारनंतर केंद्र बंद झाले. आता मनपाने आरोग्य विभागाकडे सव्वा लाख लशींची मागणी केली. त्यामध्ये एक लाख कोविशिल्ड आणि २५ हजार कोव्ॉक्सिन लस मात्रांची मागणी आहे. जो पर्यंत लस उपलब्ध होणार नाही, तो पर्यंत लसीकरण करता येणार नाही.

– डॉ. नीता पाडळकर, आरोग्य अधिकारी महापालिका