X

औरंगाबादेत बुधवार आंदोलनवार

शिक्षकांसह संबंधित काही संघटनांची वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलने झाली.

भाजप, मनसे, राष्ट्रवादी, शिक्षक संघटनाही आक्रमक

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिक्षकांसह संबंधित काही संघटनांची वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलने झाली. त्यामुळे ५ सप्टेंबर (बुधवार) हा दिवस आंदोलनांचा वार ठरला.

परभणी-औरंगाबाद या मार्गे जाणाऱ्या रेल्वे या शिवाजीनगर भागातून जात-येत असल्यामुळे प्रत्येक वेळी फाटक लावले जाते. त्यामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असून शिवाजीनगर ते देवळाई चौक दरम्यान उड्डाणपूल उभारण्यात यावा अथवा भुयारी मार्ग तयार करण्यात यावा, या मागणीसाठी भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष विनायकराव हिवाळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे पाटील, नगरसेवक राजू शिंदे, भाजपचे मंडळ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे आदी उपस्थित होते.

भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी मुलीला पळवून आणण्याच्या संदर्भाने केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने क्रांती चौकात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोडे-मारो, तर मनसेने मुंडावळ्या बांधून आंदोलन केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील महिला पदाधिकारीही मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. विनाअनुदानित संस्थेतील शिक्षकांनी क्रांती चौकात भीक मागो आंदोलन केले. डी.टी.एड, बी. एड स्टुडण्टस असोसिएशनच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. सर्व जिल्हा परिषदेतील शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, खाजगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये करण्यात येऊ नये, यासाठी संतोष मगर, प्रशांत इंगोले आदींच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे औरंगाबाद शहरात दिवसभर सरकारच्या विरोधातील घोषणांचा वर्षांव सुरू होता.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) परिचारिकांनी बुधवारी विविध मागण्यांसाठी नर्सिग महाविद्यालयासमोर निदर्शने केली. शासनविरोधी घोषणा देत परिचारिकांच्या हक्काच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी संघटनेच्या वतीने सुमंगल भक्त, इंदुमती थोरात यांनी केली.

हिंगोलीत शिक्षकांचे बेमुदत आंदोलन

हिंगोली- शिक्षक दिनाच्या दिवशीच जिल्हा परिषदेसमोर प्रलंबित मागण्यांसाठी १०० च्या वर शिक्षकांनी बेमुदत उपोषण सुरू केले. तर विनाअनुदानीत शिक्षकांनी काळा दिवस पाळला. विषय शिक्षकांच्या पदोन्नत्या तत्काळ कराव्यात, बिंदु नियमावलीप्रमाणे खुल्या प्रवर्गातील उच्चश्रेणी मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा भराव्यात, विस्तार अधिकारीपदे भरण्यात यावीत, आदी मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे. मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदनावर किरण नारायण राठोड, हरी राजारामजी मुटकुळे, दत्ता आदी शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर २० वर्षांंपासून अनुदानाच्या आशेवर अध्यापनाचे पवित्र कार्य करुनही अनुदानासाठी हुलकावणी दिली जात असल्याने शिक्षकदिनी काळा दिवस पाळत असून, १० सप्टेंबरला भिक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.