शेतकरी नेते अशी माध्यमांतून ओळख निर्माण करणाऱ्या जयाजी सूर्यवंशी यांच्या विरोधात मराठवाडय़ात जनमत संतप्त झाले असून शनिवारी औरंगाबादमध्ये त्यांच्या विरोधात विविध संघटनांनी निदर्शने केली. जयाजी सूर्यवंशी यांच्या विश्वासार्हतेवर पूर्वीपासूनच संभ्रम होते. पूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला खिशाला लावणारे सूर्यवंशी जायकवाडी संघर्ष समितीचे प्रमुख म्हणून काम करत होते. त्यानंतर यांनी काही दिवस ‘आप’ची टोपी घातली. राजकीय पटलावर भाजपची हवा जोरात होती, तेव्हा त्यांनी काही दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचा गणवेशही परिधान केला होता. या पाश्र्वभूमीवर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, आज दिवसभर त्यांच्या विरोधात काही आंदोलने सुरू होती. मात्र, मराठवाडय़ात संपाबाबतचा संभ्रम कायम असल्याचे दिसून आले. शेतकरी संघटनांच्या विविध नेत्यांनी त्यांचा निषेध करीत आंदोलन सुरूच राहील, असे शनिवारी सांगितले.

दरम्यान, शेतकरी संपाचे परभणी जिल्’ाात दोन दिवसांपासून पडसाद उमटत असताना आजही शेतकऱ्यांनी आपला संताप विविध मार्गाने व्यक्त केला. विशेष म्हणजे शेतकरी संपाबाबत आज सकाळपासून वृत्त वाहिन्यांवरून संभ्रम वाढवणारे वृत्त प्रसिद्ध होत असतानाही जिल्’ाात आंदोलनाची धार कायम ठेवली. दरम्यान, राज्यपातळीवर शेतकरी संपाबाबत जी भूमिका घेतली जाईल, त्यानुसार जिल्’ाात आंदोलन केले जाईल. एवढेच नाही तर पूर्वघोषित ‘चक्का जाम’ आंदोलनालाही जिल्हय़ातून भक्कम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आज शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. ब्राह्मणगाव येथे भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्यात आला. आज शहरात ‘शनिवार बाजार’ नेहमीसारखा गजबजलेला नव्हता. बहुतांश शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला विक्रीस न आणल्याने काही मोजकीच दुकाने बाजारात होती. परभणीत त्यामुळे आज भाजीपाल्याचे भाव अक्षरश भडकले होते. वांगे ८० रुपये किलो तर इतर भाजीपालाही ५० ते ६० रुपये किलो विक्री सुरू होती. सकाळी भाजीपाल्याचा लिलाव होतो त्या ठिकाणी कार्यकत्रे जमा झाले. मात्र, त्यांनी कोणताही अनुचित प्रकार न घडवता लिलाव बंद पाडण्याचे आवाहन केले. त्यानुसार व्यापाऱ्यांकडून तुरळक खरेदी झाली.

शेतकरी संप व किसान क्रांती जन आंदोलन ७ जूनपर्यंत चालूच राहील, असा निर्धार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनेही करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा फेटाळून लावत आहोत अशी भूमिका भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉ. राजन क्षीरसागर, अ‍ॅड. लक्ष्मण काळे, कॉ. मुनेश्वर देवडे आदींनी घेतली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनेही आज शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कीर्तिकुमार बुरांडे, बालासाहेब भाबट, शिवाजीराव पौळ, रवि गवारे, सखाराम िशदे, लक्ष्मणराव मुळे, मारोतराव काळे, सिद्धार्थ तालेवाड, रामभाऊ ढवळे आदींनी सहभाग नोंदवला. मानवत रोड येथे दुधाचा टेम्पो अडवून त्यातील दूधही रस्त्यावर ओतले. सेलू शहर आज कडकडीत बंद होते. सेलू येथेही दर शनिवारी बाजार भरतो मात्र आज शनिवार बाजारात मोठा शुकशुकाट होता. शहरातील दुकानेही बंदच होती.

ही तत्त्वहीन माघार निषेधार्ह – गोविंद जोशी

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला होता, तथापि कर्जमुक्ती (कर्जमाफी नव्हे) सोडता किसान क्रांतीची इतर कोणतीही मागणी शेतकरी संघटनेला पूर्णत मान्य नव्हती. तरीही शेतकरी एकजूट होत आहेत या कारणासाठी तात्त्विक मुद्दे सोडून संघटनेने पाठिंबा दिला. या निमित्ताने शेतकरी संपाची डोळे दिपवणारी ताकद पाहायला मिळाली आणि २-३ दिवसांत शासन शरण आले असते व योग्य तोडगाही निघाला असता. परंतु किसान क्रांतीच्या काही नेत्यांनी वैचारिक दौर्बल्य व कचखाऊ रणनीती दाखवून एकूण शेतकरी चळवळीला खाली पाहायला लावले असेच खेदाने म्हणावे लागते, अशी प्रतिक्रिया ‘शेतकरी संघटना’चे कार्याध्यक्ष गोविंद जोशी यांनी दिली आहे. सर्व शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती व थकीत वीज देयकातून मुक्ती, निव्वळ मुद्दलासाठी १० वष्रे मुदत आणि सर्व व्याज-सरकारने भरावे, असा मार्ग यापूर्वीच आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितला आहे, असेही जोशी म्हणाले.

मालवाहतूक करणारी वाहने पेटविणार

शेतकरी संप मागे घेण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप दिवसेंदिवस तीव्र होणार आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील टेम्पो, ट्रक आदी वाहनधारकांनी शेतमाल वाहतूक केल्यास, अशी वाहने अडवून ती जाग्यावरच जाळण्यात येतील, असा इशारा शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर यांनी दिला. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत सर्व वाहनधारकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे. संपात सर्व वाहनधारकांनी दूध, भाजीपाला व अन्नधान्याची वाहतूक करणे थांबवावे, अन्यथा त्यांची वाहने जाळल्यास ते स्वत जबाबदार राहतील, असेही बोंदर यांनी स्पष्ट केले आहे.