पाकिस्तानातून औरंगाबादवासी झालेल्या चावला यांची प्रतिक्रिया

औरंगाबाद : नागरिकत्व सुधारित कायद्यामुळे आमच्यासारख्या अनेकांची होणारी ससेहोलपट आता थांबली आहे. विशेषत: प्रशासकीय पातळीवर प्रत्येक ठिकाणी आणि पावलोपावली परवानगी मिळवण्यासाठी झगडावे लागत असे. आता एक प्रकारची निश्चिंतता मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया मुळचे पाकिस्तानातील असलेले वासुदेवराव चावला यांनी व्यक्त केली आहे. आता पाकिस्तानातील राहिलेल्या हिंदूंनाही भारतात आणून स्थायिक करावे. म्हणजे पाकिस्तान पूर्णपणे हिंदुमुक्त राष्ट्र होईल, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानातून औरंगाबादमध्ये आलेले ४० ते ५० जण आहेत. त्यातील एक वासुदेवराव चावला. चावला यांचे मूळ गाव पाकिस्तानच्या सिंध प्रांतात. तेथील घोटकी जिल्ह्य़ातील उबारो या तालुक्याच्या शहरातील ते रहिवासी. भारत-पाकिस्तान फाळणीच्या दरम्यान चावला यांचे पूर्वज पाकिस्तानातच राहिले. मात्र ३० वर्षांपूर्वी ते औरंगाबादेत आले. येथे त्यांचा बी-बियाणे शेतकी साहित्य विक्रीचे दुकान आहे. परंतु पूर्णपणे भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी त्यांना दोन तप झगडावे लागले.

याबाबत चावला म्हणाले, ‘‘दीर्घकालीन व्हिसाअंतर्गत मी औरंगाबादेत वास्तव्यास राहिलो. व्यवसायाच्या निमित्ताने अन्य ठिकाणी जावे लागण्यासाठी पोलीस आयुक्तालयातून परवानगी घ्यावी लागत असे. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागत. त्याची पडताळणी औरंगाबादसह मुंबई, दिल्लीत होत असे. या कालावधीत पोलीस आयुक्तालयात अनेकवेळा हेलपाटे मारावे लागत असत. त्यातून मुख्य काम बऱ्याच वेळा राहून जायचे. एकदा व्हिसा संपला तेव्हा पाकिस्तानातून पुन्हा राहण्याचा कालावधी वाढवून घ्यावा लागला.’’

सध्या भारतात नागरिकत्व सुधारित कायदा अस्तित्वात आल्याबद्दल चावला समाधानी दिसत आहेत. याबाबत ते म्हणाले, ‘‘आता भारत सरकारने पाकिस्तानातील उर्वरित दोन ते तीन टक्के हिंदूंनाही येथे आणावे. येथेच स्थायिक करण्यासाठी त्यांना सहकार्य करावे लागणार आहे. कारण सिंध प्रांतातून येथे यायचे असेल तर तेथील संपत्ती ही अत्यंत कवडीमोल दरात विक्री करावी लागते. २० लाखांत विक्री झाली तर येथे त्याचे नऊ लाखच होतात. तेवढय़ा कमी पैशांत कसे स्थिरावणे होईल, त्यासाठी सरकारची मदत आवश्यक ठरणार आहे. तसे झाले तर तेथील हिंदू येथे येतील आणि पाकिस्तान हे हिंदुमुक्त राष्ट्र होईल.’’