जिल्ह्यात नापिकीमुळे कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या पाश्र्वभूमीवर आत्महत्या थांबविण्यासाठी गावपातळीवर मोहीम सुरू करून शेतकऱ्यांना धीर देत आहे त्या परिस्थितीला धर्याने समोर जा, असे आवाहन तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी केले. वडिलांच्या आवाहनाला १० वर्षांच्या वेदत्रयीने प्रतिसाद देत आपला वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचे पसे दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून दिले. जिल्हाअधिकारी तुकाराम कासार यांच्याकडे मदतीचा धनादेश तिने सुपूर्द केला.
गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात कमी पाऊस पडल्यामुळे पाणीप्रश्नासह खरीप व रब्बी पिके हातची गेली. पीक नुकसानीमुळे कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत जिल्ह्यात आतापर्यंत ३५वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, या साठी तहसीलदार कडवकर यांनी ग्रामीण भागात गावोगावी भेटी देत शेतकऱ्यांची धडपड लक्षात घेऊन थेट ठिबक सिंचन कंपनीशी संपर्क साधून शेतकऱ्यांना हप्त्याने ठिबक सिंचन देण्याची विनंती केली. त्यांच्या प्रयत्नाला यश आले.
हिंगोली तालुक्यात शेतकरी आत्महत्या होऊ नयेत, या साठी कडवकर यांनी प्रयत्न सुरू केले. प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना धीर देत आलेल्या परिस्थितीला धर्याने समोर जा, असे आवाहन त्यांनी केले. वडिलांच्या या प्रयत्नांचे वृत्त प्रसिद्ध झाले. ते पाहून त्यांची मुलगी वेदत्रयीही पुढे आली आणि वडिलांची धडपड लक्षात घेऊन यंदा वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचे पसे दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला.
तहसीलदार कडवकर यांची एकुलती कन्या असल्याने दरवर्षी वेदत्रयीचा वाढदिवस थाटात साजरा होतो. या वर्षी वाढदिवस साजरा करण्याला बगल देत आपल्याकडे जमलेले ७ हजार १२ रुपये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्यासाठी वडिलांना सुचवले. या रकमेचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळग्रस्त निधीस देण्यासाठी बँकेतून काढून देण्याची विनंती वडिलांना केली आणि सरळ जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी कासार यांच्याकडे धनादेश दिला. तिच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.