गेल्या दोन आठवडय़ांतील या वेगवेगळ्या घटना. पण संदर्भ साधारपणे सारखेच. त्यांना दृष्टी नव्हती. पण बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण केलेला. म्हणूनच पुणे येथील निगडीमधून ते सहा-सात जण औरंगाबादला मुक्कामी आलेले. आल्यावर बसस्थानकावरच झोपले. नामविस्तारदिनी ‘भीमगीत’ ऐकवायची, असे ठरवून आलेली ही मंडळी दोन दिवस राहिली. त्या दिवशी ‘जय भीम’ नारा बुलंद आवाजात दिला गेला. दुसरीकडे ‘ओम गणानात्वां गणपत्ये’ अशा मंत्र वेदिक संमलनात संस्कृत भाषेवर प्रभूत्व असणारी मंडळी उच्चारत होती. त्याच कार्यक्रमात मनुष्यबळ विकासमंत्री सत्यपाल सिंग यांनी डार्विनचा सिद्धांत खोटा ठरविण्याचा प्रयत्न केला. एमआयएमचे असदुद्दिन ओवेसी यांच्या जाहीर सभेत ‘नारा- ए- तकबीर’च्या घोषणा दिल्या गेल्या.

नामविस्तारदिनी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचे भाषण झाले. खरे तर ते कसेबसेच पूर्ण झाले, असे म्हणावे लागेल. त्यांच्या भाषणादरम्यान झालेली घोषणाबाजी दलित माणसांच्या मनातील खदखद सांगण्यास पुरेशी होती. भीमा-कोरेगाव प्रकरण, त्यांनतरच्या हिंसक प्रतिक्रिया यामुळे विद्यापीठ नामविस्तार कार्यक्रमादरम्यान औरंगाबाद शांत राहिले पाहिजे, याची जाणीव राज्य सरकारला होती. त्यांनी यासाठी खास पोलीस अधिकारी नेमले होते. भवताल एवढा अस्वस्थ असतानाही त्या दृष्टीहीन माणसांना बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी औरंगाबादला यावे वाटते, यात बरेच काही सामावले आहे. वयाची साठी ओलांडलेले एकजण सोलापूरहून खास आले होते, बाबासाहेबांच्या प्रतिमा घेऊन!  अनेक ठिकाणी पुस्तकांची दालने होती. भीमा-कोरेगावच्या प्रतिक्रियेनंतर नामविस्तारदिनी जमलेला समुदायात ‘जय भीम’ चा नारा पवलोपावली दिला जात होता तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे मलिंद महाविद्यालयाच्या परिसरातील वसतिगृहाची पाहणी करत होत्या. या वसतिगृहाच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. ‘शिका, संघटित व्हा’ हा बाबासाहेबांचा संदेश पुढे जात होता..

काळ संक्रमणाचाच असल्याच्या दर्शवत घटना-घडामोडी पुढे सरकत होत्या. मंत्र वेदिक संमेलनाच्या निमित्ताने सनई चौघडे वाज होते. नऊवारी साडय़ा घालून महिला स्वागतासाठी उभ्या होत्या. तेव्हा देशाचे मानव विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह दीप प्रज्वलित करीत होते. ‘आयो फिरसे दिया जलाये’ असे सूत्रसंचालक सांगत असताना सत्यपाल सिंग यांनी मात्र माणूस उत्क्रांतीच्या सिद्धांतावरच प्रश्नचिन्ह उभे केले. माकड आमचे पूर्वज नाहीत. कोणत्याही पिढीत माकडाचा माणूस झाल्याचे दिसून आले नाही, असे सांगत वैज्ञानिकांना आव्हान दिले. डार्विन आणि त्याचा उत्क्रांतीचा सिंद्धात खोटा असल्याचे सांगताना सत्यपालसिंग म्हणत होते. जुन्या परंपरा, भारताच्या गौरवशाली परंपरांची पुनस्र्थापना करायची असेल तर वेद हेच, त्यावरील एकमेव उत्तर आहे. त्यांचे हे विचार व्यक्त होत होते तेव्हा त्या मंचावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अवघडून बसले होते. उच्च शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे सत्यपाल सिंह आवेशाने सांगितले. संस्कृत भाषेत वेदसुक्तांचा आधार घेत ‘परम वैभव’ मिळवून देण्यासाठी आणि देशातील सर्व समस्यांवर वेदज्ञान हेच उत्तर असल्याचे ते सांगत होते. त्याच वेळी आर्य भारताबाहेरुन आल्याचा इतिहास चुकीचा असल्याचा दावाही त्यांनी केला.

अशीच आक्रमकता होती ओवेसीच्या भाषणात. तीन वेळा तलाक शब्द उच्चारुन मुस्लिम समाजात होणारे घटस्फोट आणि त्याचा मंजूर होऊ पाहणारा कायदा ही प्रक्रिया मुस्लिम शरियतमध्ये घुसखोरी करण्याचा डाव असल्याचे सांगत एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन आवेसी यांनी औरंगाबाद येथे सोमवारी सभा घेतली. कार्यक्रमस्थळी हात उंचावून बोटाच्या तर्जनीने इशारा देणारे ओवेसी यांचे छायाचित्र त्यांच्या भाषणातील आक्रमकता सांगण्यास पुरेसे होते. आमच्यामध्ये काही बदल घडण्याची गरज आहे. पण त्यासाठी ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ आहे. त्यामुळे केला जाणारा कायदा कसा चुकीचे हे सांगताना त्यांनी पुन्हा संघटनात्मकदृष्टय़ा विस्कळीत होऊ लागलेल्या एमआयएमची बांधणी केली. असे करताना एमआयएमचा खरा चेहरा मोठय़ा खुबीने पुढे करण्यात आला. आमदार इम्तियाज जलील याचे सर्वात मोठे काम कोणते, याची आठवण करुन देताना सूत्रसंचालक सांगत होता, ‘औरंगाबादच्या विमानतळावरुन तस्लिमा नसरीन यांना परत पाठविणे.’ पण याच मंचावर ओवेसी यांचा मोठा जंगी सत्कार झाला. त्यांच्या आणलेला पुष्पहार क्रेनने उचलावा लागत होता. हा हार शहरातील दलित नगरसेवकांनी आणला होता, हे विशेष. नव्या प्रकारची कट्टर विचारांकडे घेऊन जाणारी  घुसळण सुरू असतानाच मराठवाडय़ात पक्षीय बांधणीला चांगलाचा वेग देण्यात सगळेच पक्ष मश्गुल आहेत. पण, राष्ट्रवादीचा ‘हल्लाबोल’ त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविणार असला तरी कुरघोडीचे खेळही तसे रंगले. यामध्ये बीडमध्ये आमदार जयदत्त क्षीरसागर यांची कोंडी झाल्याचे दिसून आले. या हल्लाबोल यात्रेदरम्यान अधून-मधून अजित पवार ‘ शाहू-फुले-आंबेडकर’ यांचा विचारवसा राष्ट्रवादीकडेच असल्याचा दावा करत होते. भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी गोवोगावींच्या सभांमधून मांडली जात होती तेव्हा वर्तमानातील अस्वस्थता अधिक तीव्र होत अंगावर येत होती. तत्पूर्वी काही गाडय़ा ‘भीमा कोरेगाव’च्या प्रतिक्रियेमध्ये जाळल्या होत्या. एका मुलाचा मारहाणीमध्ये मृत्यू झाला होता. मंत्रोच्चार ऐकवत सुरू असणाऱ्या वेदिक संमेलनातील गतवैभवाचे गोडवे गाणारे एका बाजूला तर ‘भीम गीत’ म्हणत जेथे भीमसागर उसळतो त्या ठिकाणी जाण्याची ओढ असणारे अनेक चेहरे दुसऱ्या बाजूला. असे हे अस्वस्थ वर्तमानाचे चित्र.

इतिहासाच्या पुनर्लेखनाचा सरकारचा डाव – पी. साईनाथ

बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी आलेल्या त्या सहा-सात जणांचा चेहरा आणि मानव विकास मंत्री सत्यपाल सिंग यांच्या भाषणात मोठी दरी दिसत होती. या सगळया घटनांची संगतवार मांडणी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केली. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यापीठ विद्यार्थी संमेलनामध्ये ते सांगत होते-‘ शांती निकेतनच्या कुलगुरुंनी आता विद्यापीठामध्ये गोशाळा बनविण्याचे ठरविले आहे. कारण त्यांची पदोन्नती हवी आहे.’, रोहित वेमूलाचा अंत झाल्यांनतर त्याची जात कोणती, हे ठरविण्यासाठी सरकारचा कसा आटपिटा चालला होता, याची माहिती त्यांनी दिली. पदवी कोणत्या राज्याची हे माहीत नसणारे पंतप्रधान ज्या देशात आहेत. तेथील उच्च शिक्षणाचा दर्जा या पेक्षा चांगला काय असू शकेल, असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले, ‘इतिहासाच्या पुनर्लेखन ही सरकारची मध्यवर्ती संकल्पना आहे. त्यासाठी उच्च शिक्षणामध्ये अनागोंदी निर्माण केल्या जात आहेत.’  त्यांच्या भाषणाला पुष्टी देणारे वक्तव्य अगदी दुसऱ्या दिवशी सत्यपाल सिंग यांनी केले.