दोन वर्षांपासून उत्तम जेवण देण्याचा उपक्रम

औरंगाबाद : तीन पोळ्या, रस्सेदार भाजी, पुलावसारखा भात आणि हिरव्या मिरच्यांचा झणझणीत ठेचा, अशा मेनूचे जेवण तेही अवघ्या दहा रुपयांत. अगदी दररोज. हे काही जाहीरनाम्यातील आश्वासनापुरते नाही तर त्याचा प्रत्यक्ष आस्वादही घेता येतो शहरातील खोकडपुरा भागात शिवसेनेचा फलक लावलेल्या एका वाहनावर. दोन वर्षांपासून असे जेवण येथे मिळते. याच प्रयोगावरून शिवसेनेने त्यांच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यात दहा रुपयांत जेवण देण्याचे आश्वासन दिलेले दिसते आहे.

खोकडपुरा भागातील अभिनव टॉकीजच्या समोर सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास एक रिक्षा उभी दिसते. जेवणाचे पदार्थ ठेवण्याची व्यवस्था केलेली ही रिक्षा आहे. या रिक्षातून अवघ्या दहा रुपयात चांगल्या प्रतीच्या गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या तीन पोळ्या, जिरा किंवा पुलावसारखा भात, दररोज वेगवेगळ्या प्रकारची रस्सेदार भाजी आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा असलेले जेवण पुढय़ात येते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने दोन वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे जेवण नजीकच्या एका शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीही डब्यात घेऊन जातात. नजीकच ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. यातील कर्मचारी, कामगार, हातगाडीवाले आणि रविवारच्या बाजारात येणारे भाजी विक्रेते, खरेदीदारही या जेवणाचा आस्वाद घेतात. दिवसभरात ३०० जणांचे जेवण आणले जाते. ते संपले की जेवणाचे वाहन निघून जाते.

दहा रुपयातील जेवण व्यवस्थेचे समन्वयक रवी लोढा यांनी सांगितले की, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षांपासून ही सेवा दिली जाते. सेवा म्हणूनच त्याकडे आम्ही पाहतो. सेवा म्हटल्यानंतर तिथे नफा-तोटा हा भाग गौण. जेवणाचा दर्जा उत्तमच राहील, हे आम्ही पाहतो. अशा प्रकारच्या जेवणासाठी दहा रुपयांपेक्षा अधिक खर्च येत असला तरी त्यातून चार लोकांना रोजगारही मिळू शकतो, हेही या निमित्ताने समोर आले. महिन्यातून तीन ते चार वेळा गोड पदार्थाचाही जेवणाच्या थाळीत समावेश केला जातो. दिवाळीतही आम्ही सलग तीन दिवस गोड पदार्थ दिले. या उपक्रमात आणखी काही मदतीचे हात पुढे आले तर शहरातील इतरही मुख्य, रहदारीच्या भागात अशा प्रकारचे जेवण सुरू करण्याचा विचार आहे.