अन्य आठ मतदारसंघांत बंडाचे निशाण खाली

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्य़ातील नऊ मतदारसंघांतील ८० उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे १२८ उमेदवारांचा राजकीय पट मांडला गेला असून बहुतांश जणांनी फडकवलेले बंडाचे निशाण काढून घेण्यात आले. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांचे बळ वाढले असल्याचा दावा कार्यकर्ते करत आहेत. तनवाणी यांच्यासमवेत या मतदारसंघातील नऊ जणांनी अर्ज पाठीमागे घेतले. औरंगाबाद पश्चिम  मतदारसंघात मात्र बंडखोरी झाली आहे. या मतदारसंघातून भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला असल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. सिल्लोडमध्येही भाजप बंडखोरांनी माघार घेतली. कन्नडमध्ये मात्र बंडखोरी झाल्याचे आज स्पष्ट झाले.

औरंगाबाद जिल्ह्य़ातील नऊ मतदारसंघापैकी औरंगाबाद पूर्वमध्ये सर्वाधिक ३४ उमेदवार रिंगणात आहेत, तर सिल्लोड मतदारसंघात सर्वात कमी सात उमेदवार रिंगणात आहेत. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात राज्यमंत्री अतुल सावे रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात एमआयएमचे नासेर सिद्दिकी यांची उमेदवारी असून या मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवार दिला नाही. त्यामुळे पूर्व मतदारसंघातील लढतीकडे अनेकांचे लक्ष आहे. या मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेनेचे रेणुकादास वैद्य यांनी या मतदारसंघातील उमेदवारी मागे घेतली. याशिवाय १३ इच्छुकांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी या मतदारसंघात अधिक चुरस असेल, असे मानले जात आहे. वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही.

औरंगाबाद मध्य मतदारसंघातून बंडखोरी होईल आणि त्यातून एमआयएमला फायदा होईल, असे चित्र निर्माण केले जात होते. मात्र, भाजपच्या वरिष्ठांनी किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले. शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जाऊन तनवाणी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. याशिवाय संजय जगताप, संदीप जाधव, शेख कयूब, अयुब हुसेन खान यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या मतदारसंघात आता १४ उमेदवार रिंगणात आहेत.

फुलंब्री मतदारसंघातून हरिभाऊ बागडे निवडणूक लढवत असून काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्याबरोबर त्यांची लढत होईल, असे मानले जात आहे. या मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत. गंगापूर मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात असून भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष अण्णासाहेब माने यांच्यात लढत होईल, असे मानले जात आहे. अलीकडेच संतोष माने यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. सिल्लोड मतदारसंघात भाजपच्या बंडखोरांनी माघार घेतली आहे. सुरेश बनकर आणि सुनील मिरकर हे दोघे निवडणुकीसाठी इच्छुक होते. प्रभाकर पालोदकर या अपक्ष उमेदवाराबरोबर सत्तार यांची लढत होईल, असे मानले जात आहे. सत्तार यांनी काँग्रेस सोडल्यानंतर ते भाजपमध्ये जाण्यास इच्छुक होते, मात्र त्यांनी आनंदाने शिवबंधन बांधले. काँग्रेसने ऐनवेळेस पालोदकरांना दिलेली उमेदवारी रद्द करून कैसर आझाद यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात सात उमेदवार रिंगणात आहे. कन्नड मतदारसंघात भाजपचे मंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार यांनी शिवसेना उमेदवार उदयसिंह राजपूत यांच्या विरोधात बंडखोरी केली असल्याचे चित्र आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात उदयसिंह राजपूत अशी लढत होईल, असे चित्र दिसून येत आहे. कन्नडमधून आठ उमेदवार रिंगणात आहेत. वैजापूर मतदारसंघात १६ उमेदवार रिंगणात असून पैठणमधून १५ उमेदवार रिंगणात आहेत. औरंगाबाद पश्चिम वगळता बहुतांश बंडखोरांनी माघार घेतली असल्याचे चित्र दिसून येत आहे.