X

जायकवाडी भरले पण फायदा नाहीच, शिवतारेंची कबुली

दोन्ही कालव्याची वहन क्षमता कमी

जायकवाडी धरण तब्बल नऊ वर्षानंतर भरले. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरण भरल्याने मराठवाड्यात सर्वत्र आंनदी आनंद पहायला मिळाला. मात्र धरण भरले असले तरी धरणातील पाण्याचा पूर्णपणे वापर होणार नाही. कालव्याची वहन क्षमता कमी झाल्याने शेतीसाठी शंभर टक्के सिंचन होणे अशक्य असल्याची कबुली खुद्द जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.

जायकवाडी धरणक्षेत्रात शेती सिंचनासाठी दोन कालवे तयार करण्यात आलेले आहेत. त्यातील उजवा कालवा ३६०० क्युसेक्स क्षमतेचा आहे. मात्र त्यातून सध्या १८०० क्युसेक्स पाण्याचं वहन सुरु आहे. तर डाव्या कालव्याची क्षमता १८०० क्युसेक्स असून त्यातून ९०० ते १००० क्युसेक्सने वहन सुरु आहे. निम्म्या क्षमतेनं पाणी वहन होत असल्यामुळे शेतीच्या सिंचनासाठी पूर्णपणे पाण्याचा वापर होणार नाही, ही गोष्ट शिवतारे यांनी मान्य केली.

जलसंधारण मंत्री गिरीश महाजन आणि राज्यमंत्री विजय शिवतारे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. एकाच दिवशी कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांनी जायकवाडीच वेगवेगळे जलपूजन केलं. शिवाय दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदा आयोजित केल्या. दौऱ्याबाबत शिवतारे म्हणाले की, माझा दौरा पूर्व नियोजित होता. कदाचित महाजन यांचा दौरा ऐनवेळी ठरला असेल. त्यामुळे यातून वेगळा अर्थ काढू नये, असेही त्यांनी सांगितले. गिरीश महाजन अधिकृत जलपूजन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पाणी प्रश्नावर मराठवाड्याला न्याय देण्यासाठी काम सुरु आहे, असेही ते म्हणाले.

First Published on: September 28, 2017 8:43 pm
Outbrain