जगभर हजारो सैनिक आपला जीव धोक्यात घालून गुप्तहेर म्हणून काम करतात, मात्र ते सैनिक पकडले गेले, की आपला देश हात वर करतो तेव्हा सैनिकांच्या दु:खाला पारावार असत नाही. कुलभूषण यादवला एक न्याय व आम्हाला वेगळा का, असा सवाल पाकिस्तानच्या तुरुंगात ११ वर्षे राहिलेले माजी सैनिक विनोद सहानी यांनी उपस्थित केला.

मराठवाडा मुक्तिसंग्राम लढय़ाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने योजण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी सहानीसह देशभरातून सुमारे २० सैनिक व त्यांचे कुटुंबीय लातुरात दाखल झाले आहे. त्यांनी आपल्या कामाची माहिती पत्रकार बैठकीमध्ये दिली.

विनोद सहानी हे जम्मूचे राहणारे. ते म्हणाले, आपल्या देशातील अनेक सैनिकांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाची २० ते २५ वर्षे देशासाठी खर्च केली. अनेक जणांचे यात मृत्यू झाले. अनेकांचे मृतदेह गटारीत टाकण्यात आले.

भारतमातेसाठी काम करणाऱ्या अशा सैनिकांना सरकार वेगळा दर्जा का देते, सीमेवर लढणाऱ्या सैनिकांइतकेच आमचेही योगदान मोठे आहे. सरकारने तुरुंगात आयुष्य खर्च केलेल्या आमच्यासारख्या सैनिकांच्या भवितव्याचा विचार केला पाहिजे. आम्हाला वेतन दिले गेले पाहिजे. आमच्या कुटुंबीयांना आज उघडय़ावर राहावे लागते.

देशात जम्मू-काश्मीरमधील स्थानिक आतंकवाद्यांच्या सुरक्षेसाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात व जे देशभक्त आहेत त्यांच्यासाठी तिजोरीला कुलूप का, सरकार काँग्रेसचे असो वा भाजपचे, यासंबंधी ठोस धोरण असले पाहिजे असे ते म्हणाले.

पंजाब प्रांतातील गुरुदासपूर येथील सुरेंद्र पॉल याने आपले वडील १४ वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात होते व त्यांचा तेथे मृत्यू झाला. आजपर्यंत केंद्र शासनाने साधी दखल घेत नाही अशी खंत व्यक्त केली. प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी आपल्या संघटनेतर्फे अशा देशभक्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.