रडारचे कार्यान्वयन गुरुवारी होणार; धरणसाठा तळालाच

कर्नाटकामध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झाली असली तरी आवश्यकता असलेल्या मराठवाडय़ात मात्र हे काम कमालीचे संथगतीने सुरू आहे. मुंबईहून सोसायटी फॉर अ‍ॅपलाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड रीसर्च या संस्थेचे एस.जे पिल्लई व ज्ञानेंद्र वर्मा हे शास्त्रज्ञ बुधवारी औरंगाबाद येथे आले. उद्यापर्यंत ते डॉपलर रडारचे कार्यान्वयन पूर्ण करणार असले तरी कृत्रिम पावसाचा प्रयोग कधी होईल, हे कोणीच सांगायला तयार नाही. येत्या आठ दिवसांत हा प्रयोग होऊ शकतो. मात्र, विमान उड्डाणासाठी केव्हा तयार असेल, कोणत्या भागात प्रयोग होईल, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहेत.

राज्यभर पावसाचा कहर असला तरी मराठवाडय़ातील बीड, उस्मानाबाद लातूर जिल्ह्यात अजूनही पुरेसा पाऊस नाही. पिकांना जीवदान मिळाले असले तरी जायकवाडी वगळता मराठवाडय़ातील बहुतांश धरणांमध्ये अजूनही पाणीसाठा उणे चिन्हातच आहे. निम्न दुधना, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, सीना कोळेगाव या धरणांमधील पाणीसाठी शुन्याच्या खाली आहे. पडणारा भुरभुर पाऊस पिकांना चांगला असला तरी पाणीटंचाई हटविण्यास पुरेसा नाही. त्यामुळे मराठवाडय़ात अजूनही १०७० टँकरने   पिण्यासाठी पाणीपुरवठा करावा लागत आहे.

दरम्यान नाशिक जिल्ह्यतील पावसामुळे जायकवाडी धरणांमध्ये पाण्याची आवक मोठय़ा प्रमाणात आहे. दुपापर्यंत धरणामध्ये ५८ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, जायकवाडी वगळता अन्य जिल्ह्यंमध्ये पाणीसाठा कमी असल्याने कृत्रिम पावसाची नितांत आवश्यकता आहे. खरे तर अशा प्रयोगामुळे मोठा पाऊस पडेल काय, या विषयी अजूनही शंका घेतल्या जातात. मात्र, गेवराईसारख्या तालुक्यात थोडासा पाऊस झाला तरी तो दिलासा देणारा असल्याने कृत्रिम पावसाच्या तयारीकडे अनेकांचे डोळे लागले आहेत. बुधवारी विभागीय आयुक्तालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रडार बसविण्याच्या कामाची पाहणी केली. मात्र, रडार कार्यान्वित झाल्यानंतर किती दिवसाने प्रयोग होईल, हे कोणीच सांगत नाही. येत्या आठ दिवसांत प्रयोग होऊ शकतो, असे कृत्रिम पावसाचे काम पाहण्यासाठी नियुक्त कंपनीतील सूत्रांनी सांगितले.

धरणातील पाणीसाठा

धरणाचे नाव –    पाणीसाठा

निम्न दुधना    –    ४६.९६

येलदरी   –    १९.०६

सिद्धेश्वर  –    ५०.७९

माजलगाव –    ७८.५०

मांजरा    –    ४०.५९

निम्न तेरणा –  १५.५७

सीना कोळेगाव – ६६.६६

(धरण शुन्याच्या पातळीच्या खाली आहे. मात्र, पर्याय नसल्याने मृतसाठय़ातून पाणी उपसल्याने पाणीसाठा उणे चिन्हातच आहे.)