सुहास सरदेशमुख

४ वाजता लाळेचा नमुना घेतला. ‘एक गोळी जेवल्यावर घ्या,’ असे एक परिचारिका सांगून गेली. मग एका आठ-दहा खाटांपैकी एक खाट मिळाली आणि सुरू झाला अहवालाच्या प्रतीक्षेतील दोलायमान स्थितीमधील भयप्रवास.. संसर्ग तर झाला नसेल ना, ही शंका मन खाऊ लागे. संपर्कात तर आलो होतो; पण त्या वेळी अंतर किती होते दोघांमध्ये, याची उजळणी होत असे. दुपारी ४ वाजता औरंगाबादच्या करोना रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर दाखल झाल्यानंतर रात्री येणारे खोकण्यांचे आवाज मनात काहूर उठवीत. सोबत मोबाइल होता, एक पुस्तकही घेतले होते; पण मन काही कशात रमत नव्हते. एक मन म्हणायचे, आपले अहवाल निगेटिव्हच येणार; पण शेजारच्या माणसाला संसर्ग असेल तर? भीतीच्या सावटाखाली ४८ तास करोना रुग्णालयात घालविल्यानंतर एकदाचा अहवाल आला आणि सुटकेचा नि:श्वास सोडला..

हा अनुभव आहे दिवाकर (नाव बदलले आहे.) यांचा. सरकारी रुग्णालयातील एका व्यक्तीस करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या सदनिकेमध्ये राहणाऱ्याची तपासणी झाली. या तपासणीच्या कालावधीतील मनातील भावनांना दिवाकर यांनी वाट मोकळी करून दिली.

एका मोठय़ा हॉलमध्ये संशयित म्हणून राहण्याचे हे तास अधिक ताण वाढविणारे असतात. दिवाकर सांगत होते- शेजारी पैठणचे एक जोडपे होते. त्यांना खूप खोकला येई; कोरडय़ा खोकल्याची उबळ. मग वाटे की, यांना झाला असेल तर आपणासही होईल का हा आजार? मन घट्ट करायचे आणि मोबाइलमध्ये मन रमविण्याचा प्रयत्न करायचा.

शेजारी संशयित म्हणून एक ‘चाचा’ आले. तसे त्यांना कोणतीच लक्षणे नव्हती. म्हणजे सर्दी, खोकला असे काही नाही. रुग्णालयात दोन वेळा जेवण, नाश्ता अशी सोय असे. त्याचा लाभ घेण्यातही त्यांचा पुढाकार होता. त्यांच्या एका नातेवाईकाने जवळच्या खाटेशेजारी बोलावले आणि तेही गेले. दुसऱ्या दिवशी कळले त्यांना करोनाचा संसर्ग होता. एक खाट सोडून दुसऱ्या खाटेवर एक तरुण. त्याच्या घरातील व्यक्तीला लागण झालेली. त्यामुळे त्याची तपासणी करण्यात आलेली. त्याला पाण्याच्या बाटल्या कोणी तरी आणून द्यायचा. त्याला आणखी एक बाटली पैसे देऊन मागविली. अन्यथा पाणी संपल्यावर ते मिळविण्यासाठी मात्र जरा अधिकच कष्ट पडतात. एखादी आया किंवा परिचारिका येत त्यांनी ‘पीपीई’ घातलेले असत. त्या सांगत, अंतर ठेवून वागा. एवढेच काय ते दुसरे बोलणे. मग, कोणी तरी नमाज अदा करताना दिसायचा, तर कोणी देवाचे नाव घेताना; पण कोणी बोललेच तर प्रत्येक जण आपली ओळख लपविणारा. कोठे राहता, असा कोणी सहज प्रश्न केला तरी शहरातील एका भागाचे नाव सांगून लोक मोकळे होतात. प्रत्येकाला आपली ओळख लपवावी वाटते. रात्र अंगावर येते, या वॉर्डातील. फक्त खोकण्याचे आवाज. सायंकाळी ४ नंतर तसे नव्या कोणाचे लाळेचे नमुने घेतले जात नसत. त्यामुळे रात्रीतून कोणी तसे भरती होत नव्हते. एखाद्याचा अहवाल करोना चाचणीला सकारात्मक आला, की त्याला बोलावून घेतले जाते. त्याचे सामान आणि तो एका मजल्यावरून वरच्या मजल्यावर नेला जातो. करोना रुग्णालयातील तिसरा मजला बाधितांचा आहे.

४८ तास संशयित म्हणून काढताना जिवाची घालमेल सुरू असायची. कोरडा ठसका वातावरणात आणखी भय वाढविणारा असतो. एक पुस्तक वाचले, पण तो मजकूर आठवत नाही. मोबाइलवर दोन-चार मराठी नाटकेही पाहिली, पण आता आठवत काही नाही. रात्री कधी तरी अडीच-तीन वाजता झोप लागायची. कितीही हात धुतले, तरी हा विषाणू चिकटणार तर नाही ना, ही भीती होती. करोना झाला तरी मृत्यू होणार नाही, याची खात्री बाळगूनही ते भयाचे ४८ तास भयंकर असतात. त्यामुळे सुरक्षित राहायचे असेल, तर घराचा दरवाजाही पुढचे काही दिवस उघडू नका, दिवाकर सांगत होते.