भारतात शेकडो वर्षांपासून सहिष्णू व असहिष्णू असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. भारतातील सामान्य जनता मात्र नेहमीच सहिष्णू राहिली आहे. अलीकडे असहिष्णू लोकांचे पारडे काहीसे जड झाले आहे, असे पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांनी शनिवारी येथे बोलताना सांगितले. हिंदू व मुस्लिमांमधील मूलतत्त्ववाद्यांमुळे देशात गृहयुद्धसदृश वातावरण निर्माण झाल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित व्ही. आर. सावंत व्याख्यानमालेत गांधी यांचे व्याख्यान झाले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे अध्यक्षस्थानी होते. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे व ट्रस्टचे अध्यक्ष न्या. अरविंद सावंत व सचिव पंकज सावंत यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक व्ही. आर. सावंत यांच्या स्मृत्यर्थ या व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. गांधी यांनी मुद्देसूदपणाने व सोदाहरण ‘भारत माता : बदलती प्रतिमा’ यावर व्याख्यान दिले. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो ना कोणतीही राष्ट्रीयता. भारत आणि पाकिस्तान असा फरक दहशतवादी कधीही करीत नाहीत. दोन्ही ठिकाणी दहशतवादी नि:शस्त्र लोकांचे बळी घेत असतात, असे ते म्हणाले.
हैदराबाद विद्यापीठात रोहित वेमुला या विद्यार्थ्यांने केलेली आत्महत्या हे आजचे समाज वास्तव आहे. दलित, शोषित घटकांबद्दल अनेकांच्या मनात काय भावना आहेत, त्याचेच हे निदर्शक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना व त्यावर आधारित प्रजासत्ताक राज्य असे म्हणता येण्यासारख्या या घटना आहेत काय, असा सवाल गांधी यांनी या वेळी केला. लोकशाहीत बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ध्येय असते. प्रजासत्ताकाचे वैशिष्टय़ मात्र सर्वलोकाश्रयाय असते. रोहित वेमुला प्रकरणानंतर तो जन्माने दलित आहे की नाही, याची निष्कारण चर्चा होते. त्यापेक्षा लोकाश्रयाय हे प्रजासत्ताकाचे ब्रीद पाळले जात आहे काय, हे आज तपासणे गरजेचे आहे.
भारत माता ही संकल्पना स्पष्ट करताना गांधी म्हणाले, की आई ही सर्व लेकरांना समान लेखत असते. सर्वाचे संरक्षण करतानाच आपसातील भाईचाराही जतन करण्यास ती सांगत असते. मोहम्मद इक्बाल यांनी ‘सारे जहाँ से अच्छा’ या गीतातून, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीतातून या मातेचे यथार्थ वर्णन केले आहे. मदर इंडिया, काबुलीवाला आदी हिंदी चित्रपट व गीतांमधूनही भारत मातेची थोरवी वर्णन करण्यात आली आहे. हे राष्ट्र केवळ येथील बहुसंख्याकांमुळे नाही, तर प्रत्येक भारतीयामुळे ओळखले गेले पाहिजे. शिक्षणातून ज्ञान मिळते. मात्र, शहाणपणा येतोच असे नाही तर ते आपल्या कृतीतून आले पाहिजे. तसे झाले तरच भारताच्या संविधानातून मांडलेली नागरिक, एकसंध राष्ट्र ही संकल्पना खऱ्या अर्थाने अस्तित्वात येईल. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी आयुष्यभर अन्यायाच्या विरोधात अहिंसा अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष केला. या नेत्यांचा वारसा आपण पुढे नेत आहोत. याचे भान प्रत्येक भारतीयाने ठेवले पाहिजे. जाणते लोक, राज्यकर्ते यांनी संविधानातील एकात्मतेचा आत्मा जतन करावा, असे आवाहनही गांधी यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात न्या. बोबडे यांनी दादासाहेब सावंत पेशाने कर सल्लागार होते. मराठवाडय़ाच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय जडणघडणीत त्यांनी मोठे कार्य केले, अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव केला. कुलगुरू प्रा. चोपडे, न्या. अरविंद सावंत यांनीही विचार मांडले. उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, विधिज्ञ यांची या वेळी मोठी उपस्थिती होती.
स्वातंत्र्य हे समाजघटकांचे एकत्रीकरण – न्या. बोबडे
भारताचे संविधान हा केवळ ग्रंथ नसून लोकशाही प्रजासत्ताक देशाचा तो जिवंत दस्तऐवज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील मानवजातीचा विचार करून आपणाला आदर्श राज्यघटना दिली. लोकशाहीतील कायदे मंडळ, कार्यपालिका व न्यायव्यवस्था या स्तंभांमध्ये योग्य समन्वय ठेवण्याचे काम घटनेने केले. अलीकडच्या काळात मात्र एकमेकांच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप वाढत असल्याचे बोलले जात आहे. या पाश्र्वभूमीवर न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी लैंगिक हिंसाचार, समलैंगिकतेचा प्रश्न (कलम ३७७) आदी उदाहरणे देत आपले मत मांडले. तसेच स्वातंत्र्य हे व्यक्तिसमूहांचे वेगळेपण जपणे नव्हे, तर सर्व समाजघटकांचे ते एकत्रीकरण असते, असेही ते म्हणाले.