भाजप आणि मनसेकडून आंदोलन

औरंगाबाद : कलबुर्गी येथे केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद औरंगाबादमध्ये उमटले. भाजपच्यावतीने गुलमंडी येथे एमआयएमचे वारिस पठाण यांचा पुतळा जाळण्यात आला. त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सकाळी ११ च्या सुमारास गुलमंडी येथे कार्यकर्ते जमले.

वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. मनसेच्यावतीनेही दुपारी क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘देश के गद्दारों को, गोली मारो..’ याही घोषणा देण्यात आल्या.

कलबुर्गी येथे वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करता येणार नाही. मात्र, देश के गद्दारों को, गोली मारो असे विधान करणाऱ्यांना प्रश्न विचारले जातात का?, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडूनही अशीच उत्तरे घेतली जातील का, असा सवाल करत खासदार जलील यांनी वारिस पठाण यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यांनी चुकीची विधाने केली म्हणून वारिस पठाण यांचे चुकीचे विधान समर्थनीय ठरते का, असे म्हणताच खासदार जलील यांच्या त्या वक्तव्याशी पक्ष म्हणून काहीएक संबंध नाही. उद्या मुंबईला गेल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करू, असेही इम्तियाज जलील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

गुलमंडी येथे सकाळच्या सत्रात भाजपने वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक पुतळा जाळला. या आंदोलनात आमदार अतुल सावे, जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांच्यासह बहुतांश कार्यकर्ते उपस्थित होते. क्रांती चौकात मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. माजी आमदार हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजन, जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, सतनामसिंग गुलाटी आदी कार्यकर्त्यांनी वारिस पठाण हाय हायच्या घोषणा दिल्या.