मराठवाडय़ातील टँकरचा परीघ आता विस्तारला आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने थेट ४० किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्हय़ात पाण्याचे स्रोत आटल्याने या वर्षी टँकरवर अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. सप्टेंबर ते जानेवारी दरम्यान टँकरवर सुमारे २५ कोटी रुपये खर्च झाले. १२ हजार लिटरच्या टँकरसाठी प्रतिकिलोमीटर २१ रुपये ६० पैसे व प्रतिदिन १ हजार १७६ रुपये किराया दिला जातो. मराठवाडय़ात सध्या १ हजार ३९२ टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
लातूर शहर सध्या पूर्णत: टँकरवर अवलंबून आहे. प्रत्येक तीन गाडय़ांमध्ये एक गाडी पाण्याची, असे चित्र असल्याने येत्या काळात शहरातील वाहतुकीत टँकर ही सर्वात मोठी समस्या असल्याचे अहवाल प्रशासनास देण्यात आले आहेत. पाण्याची टंचाई एवढी आहे की, लातूर शहरात बचतीचे संदेश देताना पत्रावळीचे वाटप केले जात आहे. ताट धुण्यासाठी पाणी लागेल म्हणून पत्रावळी दिल्या जात आहेत. पाणी कोठून आणायचे, असा प्रशासनासमोरही प्रश्न आहे. फेब्रुवारी महिन्यातच पाणी आणण्यासाठी टँकरला काही तालुक्यात ४० किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. टँकरचे दर किलोमीटरवर ठरलेले असल्याने या वर्षी टँकरवर अधिक खर्च होईल. उस्मानाबाद जिल्हय़ातील भूम, परंडा व लोहारा तालुक्यांत टँकरचा परीघ वाढला आहे. औरंगाबाद जिल्हय़ातील पैठण तालुक्यातही ३५ ते ४० किलोमीटरवरून पाणी आणले जात आहे. टंचाईचे तीन महिने प्रशासनाचीही परीक्षाच असल्याचे मान्य करीत विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी टँकरमध्ये पाणी कोठून भरायचे, हा प्रश्नच असल्याचे सांगितले. बीडच्या काही तालुक्यांमध्ये कुंडलिका धरणातून पाणी आणावे लागणार आहे. येत्या काही दिवसात पाण्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जन्माला येऊ नये, या साठी स्वतंत्र नियोजन करावे लागत आहे. येत्या काळात पाण्यामुळे वाद वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. टँकरवाडय़ातील टँकरचा वाढता परीघ दुष्काळाची गंभीरता सांगणारा आहे.