20 September 2020

News Flash

लातुरात पाणी वितरणाचा बट्टय़ाबोळ

शहर पाणी वितरण व्यवस्थेत महापालिकेने गोंधळाचा कहर केला असून, अंबाजोगाई रस्त्यावरील आर्वी बुस्टरपंपावर गेल्या दोन दिवसांपासून पाणी भरण्यासाठी टँकरच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

शहर पाणी वितरण व्यवस्थेत महापालिकेने गोंधळाचा कहर केला असून, अंबाजोगाई रस्त्यावरील आर्वी बुस्टरपंपावर गेल्या दोन दिवसांपासून पाणी भरण्यासाठी टँकरच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या रांगा कधी कमी होतील? पाणीपुरवठा नेमका केव्हा सुरळीत होईल? या बाबतीत महापालिकेचे अधिकारी बोलायलाही तयार नाहीत.
‘चार घरचा पाहुणा उपाशी’ या प्रमाणे माकणी, डोंगरगाव, भंडारवाडी व साई येथून पाणी आणण्याची यंत्रणा असली, तरी प्रत्येक ठिकाणी काही ना काही अडचण असल्यामुळे लातूरकरांची तहानच भागत नाही. शहरातील पाण्याच्या ९ टाक्यांपकी काही दिवस पाच टाक्यांत पाणी साठवून तेथून वितरीत केले जात होते. नंतर हा आकडा दोन टाक्यांवर आला. आर्वी बुस्टरपंपाशिवाय नांदेड नाक्यावरील विवेकानंद चौकातील पाण्याच्या टाकीवर अत्यल्प पाणीसाठा होता. शहरातील उर्वरित पाण्याच्या टाकीच्या ठिकाणीही एक थेंबही पाणी शिल्लक नाही. एका टाकीवरूनच संपूर्ण शहराला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरमध्ये पाणी भरण्याची ठिकाणे कमी असल्यामुळे टँकरच्या रांगा हटत नाहीत.
पाणी नक्की कधी मिळेल? याची शाश्वती आता नगरसेवकांनाच नसल्यामुळे ते आपल्या प्रभागातील नागरिकांना उत्तर देऊ शकत नाहीत. पहाटेपासूनच लोकांकडून शिव्यांची लाखोली ऐकावी लागत असल्यामुळे व प्रशासनाकडून कोणतेच काम नियोजनपूर्वक होत नसल्याने नगरसेवकांचीही मोठी कोंडी होत आहे.
गुरुवारी रात्रीपासून भंडारवाडी येथून उचलले जाणारे पाणी बंद होते. माकणी धरणातील माळकोंडजी येथून उचलले जाणाऱ्या पाण्याच्या टाकीत पाणीच अत्यल्प होते. कारण माकणी धरणात टाकलेल्या पाणबुडय़ा उघडय़ा पडत चालल्यामुळे आता नव्याने पाणबुडय़ा उचलून खोल पाण्यात टाकाव्या लागणार आहेत. या कामामुळे पुन्हा पाणी वितरणाची यंत्रणा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
राज्य सरकारच्या वतीने टँकरसाठी १५ कोटी रुपये उपलब्ध केले आहेत. टँकरचा वापरही सुरू आहे. मात्र, बिनपाण्याचे भाडे देण्याची वेळ येत असून नियोजन नसल्यामुळे लाखो रुपये वाया जात आहेत. पाण्यामुळे भांडणे होऊ नयेत, प्रसिद्धीसाठी टँकरवर चढून आंदोलन करण्याचे प्रकार वाढले असल्यामुळे जिल्हय़ातील २० ठिकाणी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी १४४ कलम लागू केले आहे. त्यात डोंगरगाव, शेंद, ताजपूरपाटी, सुगावपाटी, मसलगापाटी, गौरपाटी, कवठापाटी, पानचिंचोली मोड, हलकी, वांजरखेडापाटी, तळेगाव बोरी पाटी, भंडारवाडी धरण, माळकोंडजी, तसेच लातूर शहरातील ९ ठिकाणचे जलकुंभ यांचा समावेश करण्यात आला आहे.
११ मार्च ते १० मे हा कालावधी या साठी ठेवण्यात आला आहे. या क्षेत्रात येऊन कोणी उपद्रव केल्यास कलम १८८ नुसार संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय योग्यच असला तरी पाण्यामुळे अनेक तंटे होण्याची शक्यता असल्यामुळे यापुढे अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे.
महापालिका मागेल ती मदत देऊ – दांगट
लातूर महापालिकेने शहराच्या पाणी प्रश्नासंबंधी जे प्रस्ताव आपल्या कार्यालयाकडे पाठवले ते विनाविलंब संमत केले. सर्व प्रकारच्या आíथक तरतुदी केल्या आहेत. महापालिकेने आíथक विषयाव्यतिरिक्त मनुष्यबळ वाढवून देण्याचा प्रस्ताव पाठवला तर तोही विनाविलंब मार्गी लावला जाईल. लोकप्रतिनिधी-प्रशासन यांनी एकत्रितपणे टंचाईला सामोरे जायला हवे. विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत ज्या बाबी करणे आवश्यक आहेत त्या तातडीने केल्या जातील, असे औरंगाबाद महसूल विभागाचे आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2016 1:20 am

Web Title: water distribution flop in latur
टॅग Latur
Next Stories
1 परभणी-जालन्याचे सिंचन वाढणार, मराठवाडय़ाचे अन्य जिल्हे कोरडेच!
2 अंबाजोगाईत रोहयोची अधिकाऱ्यांकडून लूट!
3 प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर पाणी.. तेही पाचऐवजी आता दहा दिवसांनीच!
Just Now!
X