जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांची पंकजा मुंडे, राम शिंदेंच्या कारभारावर टीका

जलयुक्त शिवारचा मोठा गाजावाजा सरकारने केला, मात्र या खात्याच्या एका महिला मंत्र्यांनी यात ठेकेदार घुसवले. त्यामुळे एकेकाळी चांगली असणारी योजना आता पूर्णत: फसली आहे. या योजनेसाठी ध्येयासक्त आणि पाण्यावर प्रेम करणारी व्यक्ती जर मंत्री झाली असती तर काही चांगले घडण्याची शक्यता असती. सध्या त्या क्षमता असणारा मंत्री जलयुक्तसाठी राज्य सरकारने नियुक्त केला नसल्याची टीका जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी केली. औरंगाबाद येथे कृषी प्रदर्शनात व्याख्यानापूर्वी ‘लोकसत्ता’शी बोलताना त्यांनी पंकजा मुंडे आणि राम शिंदे या दोघांच्या कारभारावर टीका केली.

पंकजा मुंडे यांनी लोकसहभागाच्या तत्त्वावर विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करण्याच्या जलयुक्त शिवार योजनेत ठेकेदारांना वाव निर्माण करून दिला. परिणामी, आता या योजनेतील लोकसहभाग आटू लागला आहे. पूर्वी या योजनेच्या नावाचा बँड वाजवला जायचा, आता हवा गेली आहे. या योजनेत आता काम होत नाही. खरेतर माथा ते पायथा पाणलोटाची  कामे वेगाने करण्याची आवश्यकता आहे. एखादे गाव पाणीदार करताना त्यातील चांगुलपणा काढून टाकायचा आणि स्वत:च्या लाभासाठी तो वापरायचा अशी ‘मराठी’ माणसाची रीत झाली आहे की काय, अशी शंका येते, असेही राजेंद्रसिंह म्हणाले. जेव्हा लाभासाठी काम होते तेव्हा त्यात घोटाळे सुरू होतात. तांत्रिकदृष्टय़ा नव्हे तर वैज्ञानिकदृष्टय़ाही जलयुक्तशिवार योजना पहिल्या मसुदय़ापर्यंत चांगली होती. आता त्यात सिमेंट बंधारे, कंत्राटे दिली जातात. जेसीबीचे कंत्राटीकरण झाले आहे. त्यामुळे अन्य योजनांप्रमाणेच ही योजनादेखील ठेकेदारांच्या ताब्यात गेल्याचे त्यांनी सांगितले. नव्याने उच्च न्यायालयाने या योजनेतील दोष दूर करण्यासाठी एक समिती गठित करण्यास सांगितले आहे. त्यांनी लोकसहभागाच्या तत्त्वावर विकेंद्रित पाणी व्यवस्थापनाचा आराखडा तयार करून द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

खरेतर पाऊस पडल्यानंतर या खात्याच्या मंत्र्यांनी अधिक दौरे करून लोकांशी चर्चा करणे, त्यांचा सहभाग वाढवणे अपेक्षित होते. नवे मंत्री सध्या फिरताना दिसत नाहीत. राजस्थानहून येऊन आम्ही काही गावे फिरतो, मात्र त्यांचा संपर्क दिसत नाही, असेही राजेंद्रसिंह राणा म्हणाले. राम शिंदे यांनी जलयुक्तला प्रोत्साहन देण्यासाठी फारसे दौरे केले नसल्याचे सांगत पंकजा मुंडे आणि राम शिंदे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

ठेकेदारीचा निर्णय योग्यच – राधामोहनसिंग

जलयुक्त शिवार योजनेत ठेकेदार घुसल्याचा उल्लेख कृषी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी जाहीर भाषणातही केला. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी मात्र सरकारने घेतलेला तो निर्णय कसा बरोबर आहे, हे सांगत राजेंद्रसिंह यांचे मत खोडून काढले. ३ लाखाच्या पुढची कामे मशिनवर केली नाहीत तर ती वेळेवर कशी पूर्ण होणार? वेळेत काम पूर्ण करायचे म्हणून राज्य सरकारने ठेकेदारांना हे काम दिले असेल तर त्याचे स्वागत करायला हवे, असे सांगत जलयुक्तमधील ठेकेदारीचा निर्णय योग्य असल्याचा दावा केला.