मराठवाडय़ातील २५ तालुक्यांमधील भूजल पातळी तीन मीटरपेक्षा अधिक खोल गेली आहे. यात धोक्याच्या पातळीवर असणारा जिल्हा म्हणून परभणीचे नाव पुढे आले आहे. सेलू तालुक्यातील भूजलपातळी मागील पाच वषार्ंच्या तुलनेत तब्बल ६.१६ मीटरने खाली गेली आहे. परभणी जिल्ह्यात उपसा कमालीचा असल्याचे दिसून आले आहे.
लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यात तीव्र दुष्काळ आहे. या भागात फारच थोडा पाऊस झाल्याने भूजल पातळी आणखी खालावेल, असा अंदाज होता. तथापि परभणीतील स्थिती अधिक भयावह असल्याची आकडेवारी आहे. गंगाखेड, सोनपेठ, जिंतूर, पूर्णा व सेलू या भागात झालेली घट तीन ते थेट सहा मीटपर्यंत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील भूजल पातळी २.३६ मीटरने खालावली आहे. अन्य तालुक्यातील स्थिती तुलनेने अधिक बरी म्हणता येईल. विशेष म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्य़ाच्या एकाही तालुक्यातील भूजल पातळी तीन मीटरपेक्षा अधिक खोल गेली नसल्याचे दिसून आले आहे.
मराठवाडय़ातील सर्व ७२ तालुक्यात भूजल पातळीत कोठेही वाढ दिसून येत नाही. नांदेडच्या सर्व १६ तालुक्यात भूजल घटलेलेच असले तरी ती वाढ नायगाव व लोहा वगळता अन्यत्र तीन मीटरच्या आतच आहे. भूजल विकास यंत्रणेकडून ऑक्टोबर महिन्यात निरीक्षण विहिरीतील भूजल मोजले जाते. त्याची मागील पाच वर्षांच्या भूजल आकडेवारीशी तुलना केली जाते. या तपशिलात सेलू व आष्टी हे दोन तालुके धोक्याच्या पातळीवर असल्याचे दिसून आले आहे.
तीन मीटरपेक्षा अधिक तालुक्यांची जिल्हानिहाय आकडेवारी
बीड  –  ५ तालुके (बीड, गेवराई, पाटोदा, आष्टी, अंबाजोगाई)
नांदेड – ५ तालुके (नांदेड, देगलूर, धर्माबाद, नायगाव, लोहा)
परभणी – ७ तालुके (मानवत, परभणी, गंगाखेड, सोनपेठ, जिंतूर, पूर्णा, सेलू)
िहगोली –  ३ तालुके (वसमत, औंढा, सेनगाव)
लातूर –   ५ तालुके (अहमदपूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ, चाकूर, जळकोट)