मनपा प्रशासक पाण्डेय यांची माहिती

औरंगाबाद  : शहरातील २५ हजार व्यावसायिक मालमत्तांसाठी पाणी मीटर बसविण्याची प्रकिया दोन महिन्यांत सुरू केली जाणार आहे. त्याकरिता स्मार्ट सिटी योजनेतून मीटर खरेदी केले जातील, असे मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शहरात पाणी पुरवठा करण्यात सध्या अडथळा येत असला तरी दोन्ही योजनांच्या आधारे पाणी वितरण केले जात आहे. दररोज १२५ एमएलडी पाणी मिळत आहे. त्यामुळे पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. पाणी पुरवठय़ामध्ये सुधारणा घडवून आणण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरात २५ हजार व्यावसायिक मालमत्ता असून या मालमत्तांना नळ जोडणी देण्यात आलेली आहे. परंतु अनेकांनी निवासी मालमत्ता म्हणून त्याची नोंद केलेली आहे. त्यामुळे व्यावसायिक दराने पाणीपट्टी आकारण्यात अडचणी येत आहे. व्यावसायिक मालमत्तांना देण्यात आलेले नळ कनेक्शन शोधण्यात आले असून त्याकरिता मीटर बसविण्याची प्रकिया दोन महिन्यांत सुरू केली जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतून वॉटर मीटरची खरेदी करण्यात येणार आहे.

मालमत्ता कर, पाणीपट्टी भरावीच लागणार

शहरातील मालमत्ताधारकांना कर भरण्यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता लवकरच अ?ॅपव्दारे ऑनलाइन सुविधा मिळणार आहे. पारदर्शक पध्दतीने ही प्रणाली तंत्रसुलभ केली जाणार आहे. वॉर्ड कार्यालय आणि मुख्यालय देखील जोडले जाणार आहे. त्यामुळे जे मालमत्ताधारक कधीही कर भरत नव्हते त्यांना जोडले जाणार असल्याने त्यांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरावीच लागेल असेही पांडेय म्हणाले.