गरज ही शोधाची जननी, तसेच परिस्थितीपेक्षा दुसरा श्रेष्ठ गुरू नाही, असे म्हटले जाते. ते सार्थ असल्याची प्रचिती तीव्र पाणीटंचाईने सध्या लातूरकर घेत आहेत. दूध पोळल्यानंतर ताकही फुंकून प्यावे लागते, असे सांगितले जाते. त्याप्रमाणे आता घरोघरी आपापल्या कल्पकतेने पाणीबचतीचे उपाय योजले जात आहेत.
राजधानी दिल्ली शहरातील वाढत्या प्रदूषणावर उपाय म्हणून केजरीवाल सरकारने सम-विषम पद्धतीने वाहने रस्त्यावर आणण्याचा पर्याय अमलात आणण्याचा निर्णय घेतला, त्यावर समाजमाध्यमांद्वारे लातूरकरांनीही पाणीटंचाईवर काय उपाय करावेत, या बाबतच्या सूचना झळकण्यास सुरुवात झाली. सोमवार, बुधवार व शुक्रवार घरातील महिलांनी, तर मंगळवार, गुरुवार व शनिवार पुरुषांनी अंघोळ करावी आणि रविवारी संपूर्ण कुटुंबीयांनीच अंघोळीची गोळी घ्यावी, अशी एक सूचना होती. मात्र, सुरुवातीला या सूचनेची थट्टा झाली. परंतु प्रश्नाचे गांभीर्य लातूरकरांनी ओळखले होते. सध्या अनेक कुटुंबांत अध्र्या बादलीत अंघोळ करण्याचे उपाय अमलात आणले जात आहेत. मे महिन्यात पाण्याने अंग पुसून घेण्याची खूणगाठ नागरिकांनी आताच बांधली आहे.
भांडी घासण्याचे पाणी वाचवण्यासाठी पत्रावळी व द्रोणाचा वापर अनेक कुटुंबांत होत आहे. शहरातील सुभाष चौक मित्रमंडळाच्या पुढाकाराने परिवहन सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना प्रातिनिधिक स्तरावर द्रोण, पत्रावळीचे वाटप करून प्रत्येकजण किमान एक ते दीड लिटर पाण्याची बचत करू शकतो, असा संदेश दिला. सध्या हॉटेलमध्ये पाण्याने भरून ठेवलेले ग्लास इतिहासजमा झाले आहेत. मागेल त्याला व आवश्यक तितकेच पाणी दिले जाते. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे ठळक आवाहन केले जात आहे. घरोघरी सांडपाण्याचा पुनर्वापर आपापल्या परीने कल्पकतेने केला जात आहे. एप्रिल-मे महिन्यांत घरातील वृद्ध व लहान मुलांना या वर्षी ज्या भागातील नातेवाइकांकडे पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी पाठवण्याच्या योजना आखल्या जात आहेत. अक्षरश रात्रंदिवस पाणी उपलब्ध करणे, हाच एकमेव ध्यास सर्व स्तरावरील कुटुंबांत आहे.
पाण्याचा गुणधर्म तो प्रवाही झाल्यानंतर समान पातळीवर राहतो. त्यानुसार गरीब व श्रीमंत याची दरी पार करीत पाण्याने सर्वानाच पाण्याचा जपून वापर करण्याचा संदेश दिला जात आहे. पाणी विकत घेण्याची क्षमता असणाऱ्या मंडळींना पसे देऊनही पाणी नाहीच मिळाले तर काय, या चिंतेने ग्रासले आहे. अशा मंडळींच्या घरातही पाण्याचा काटकसरीने वापर केला जात आहे. पाहावे तिकडे पाण्याचे छोटे- मोठे टँकर रस्त्यावर दिसतात. पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे आताच पाण्याच्या दरात दुपटीने वाढ झाली. ५०० रुपयांत ५ हजार लिटरचा टँकर मिळत होता, तो आता १ हजार रुपयाला झाला आहे. अर्थात, तोही मागणी नोंदवल्यानंतर तीन दिवसांनी मिळत आहे. फेब्रुवारीतील ही स्थिती आहे. मे महिन्यात ५ हजार रुपये मोजूनही टँकरचे पाणी मिळेल की नाही, याची शाश्वती देता येत नाही.
तेल-तुपाचा वापर स्वयंपाकघरात ज्या काटकसरीने होतो, तशीच काटकसर आता पाण्यासाठीही सुरू झाली आहे. गेल्या २५ वर्षांपासून लातूरकर पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. दररोज नळाला पाणी येणे ही लातूरकरांसाठी कविकल्पना आहे. पाण्याचा इतका त्रास असला, तरी इतके दिवस ‘असल्या दिवशी दिवाळी अन् नसल्या दिवशी शिमगा’ याच पद्धतीने वागण्याची सवय होती, ती या वर्षी तीव्र टंचाईमुळे बदलू लागली आहे. या वर्षी पाण्याचे भीषण संकट ओढवणार याचा अंदाज सहा महिन्यांपूर्वीच आला होता. पावसाळय़ातच ‘पाण्या तुला शोधू कुठे?’ असे म्हणण्याची वेळ आली होती. पाणीच उपलब्ध होणार नसल्यामुळे आहे ते पाणी पुरवून वापरण्याला पर्याय नाही हे समजल्यामुळे पाणी बचतीचे उपाय घरोघरी अमलात आणले जाऊ लागले आहेत.
वाणी, नाणी, पाणी!
वाणी व नाणी जपून वापरली पाहिजे, याचे प्रबोधन घरोघरी लहानपणापासून केले जाते. मात्र, पाण्याच्या बाबतीत असा संदेश दिला जात नाही. भविष्यातील बेगमी म्हणून पशाची बचत करून बँकेत ठेव ठेवली जाते. अन्नधान्याचा तुटवडा पडू नये म्हणून वर्षभराची तरतूद उन्हाळय़ातच केली जाते. मात्र, पाण्याची तरतूद करण्याची सवय लोकांना नव्हती. याचे गांभीर्य आता सर्वानाच लक्षात येऊ लागले आहे. बारा वर्षांपूर्वी छतावरील पाणी जमिनीत मुरवण्यासाठी चेन्नईनंतर सर्वाधिक प्रयत्न करणारे शहर म्हणून लातूरची नोंद झाली होती. मात्र, त्यानंतर पाऊस झाला व पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी स्थिती निर्माण झाली. १२ वर्षांनंतर पुन्हा पाण्याचे तीव्र संकट समोर उभे राहिल्यामुळे राजस्थानप्रमाणे पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी साठे निर्माण करण्याच्या योजना आखल्या जात आहेत.