लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करून देशभर नाव झालेल्या सांगलीत सध्या तीव्र पाणीटंचाई भासत असून, जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या कोयना व वारणा धरणांतील पाणीसाठा पावसाचे एक नक्षत्र संपले तरी तसूभरही वाढलेला नाही. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या कृष्णा नदीतील पाणीपातळी कमी झाल्याने लातूरचा पाणीपुरवठा गेले तीन दिवस बंद असून, गेल्या २४ तासांत शिराळय़ातील १० आणि आटपाडीतील ८ मिलिमीटर पाऊस वगळता अन्यत्र ढगाळ हवामानच आहे.

कोयना धरणात दरवर्षी जूनअखेर पाणीसाठा २० टीएमसीच्या पुढे असतो. यंदा पाणीसाठा वाढण्याची सध्या तरी चिन्हे दिसत नाहीत. मात्र आशादायक स्थिती निर्माण झाली असून, मंगळवारपासून कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाला आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस असल्याने धरणाच्या पाणीपातळीत मात्र वाढ झालेली नाही.

सांगलीतील जलसंपदा विभागाकडून बुधवारी सकाळी सात वाजता असलेला धरणातील पाणीसाठा असा आहे कोयना १२.२६, वारणा ७.१६, धोम २.७८, कण्हेर १.८३, राधानगरी १.३२ आणि दूधगंगा ९.९१ टीएमसी असा आहे. केवळ वारणा धरणातील पाणीसाठय़ात ०.२८ टीएमसीने वाढ झाली आहे. अन्य कोणत्याच धरणातील जलाशयाच्या साठय़ात वाढ झालेली नाही.

बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजा येथे नोंदला गेला असून, या ठिकाणी ८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विविध ठिकाणी गेल्या २४ तासांत झालेला पाऊस असा कोयना ६३, महाबळेश्वर ३५, धोम ४, कण्हेर २ आणि चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४३ मिलिमीटर पाऊस झाला.

राधानगरी येथे ५० आणि दूधगंगा येथे ५० मिलिमीटर इतका पाऊस नोंदला गेला असल्याचे जलसंपदा विभागातून सांगण्यात आले. पिण्याच्या पाण्यासाठी कोयना धरणातून गुरुवारपासून प्रतिसेकंद १३०० आणि चांदोली धरणातून २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

धरणातून सोडलेले पाणी उद्या सायंकाळपर्यंत सांगलीत पोहोचण्याची शक्यता असून, शहराला पाणीपुरवठा करण्यात येणारे जॅकवेल या वर्षी तिसऱ्यांदा उघडे पडले आहे, तर पाणीपातळी घटल्याने गेले तीन दिवस लातूरला रेल्वेने करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. आज सायंकाळी म्हैसाळ बंधाऱ्याच्या ठिकाणी पाणीपातळी ३ फूट झाली असून, ही पातळी साडेचार फूट झाल्यानंतरच लातूरसाठी पाणीपुरवठा करता येणार आहे. यामुळे शुक्रवारी लातूरसाठी पाणी उपसा पंप सुरू करता येणार असल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले.