साखर कारखाने केवळ राजकीय अस्तित्वाचे अड्डे आहेत. मराठवाडय़ासह राज्यातील साखर कारखानदारीमुळे आपल्यासमोर पाणीसंकट उभे आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची मनापासून भूमिका आहे. मात्र, संकट मोठे असल्याने याला वेळ लागणार असल्याचे भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले.
तुळजापुरातील वंदे मातरम् प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘दुष्काळ, पाणी व आपण’ या व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी गणेश जळके होते. नगराध्यक्षा अॅड. मंजूषा मगर, संस्थेचे अध्यक्ष शैलेश पोतदार यांची उपस्थिती होती. भंडारी यांनी तुळजाभवानी, जिजाऊ व स्वामी विवेकांनदांच्या प्रतिमेचे पूजन केले. जलयुक्त शिवार अभियान मराठवाडय़ाला पाण्याच्या विषयात सक्षम करणारे आहे. जलयुक्त शिवारमुळे मराठवाडय़ात २४ टीएमसी पाणी उपलब्ध असून त्यामुळे दुष्काळाची झळ कमी जाणवत आहे. ही योजना दुष्काळाला कायमस्वरुपी दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कोकणात १३५ मिमीऐवजी ९० मिमी, तर मराठवाडय़ात केवळ ८६ मिमी पाऊस झाला. पावसाचे कमी झालेले प्रमाण देशाला व शेतीक्षेत्राला घातक ठरणारे आहे. मात्र, यावर उपाय करण्यासाठी आपण कमी पावसावर येणारी पीकपद्धती अवलंबावी लागणार असल्याचे भंडारी यांनी सांगितले.