बिपीन देशपांडे

नावात काय आहे? तर अक्षरशास्त्र. या अक्षरशास्त्रातील शुभअशुभाचा अंदाज घेऊन नाव बदल करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असून त्यातूनच नव्या कामाचा व्याप शिक्षण विभागाकडे वाढलेला दिसतो आहे. विद्यार्थी, पालक, विवाहित, घटस्फोटित महिलांकडून नाव-आडनावासह अक्षरांमध्ये बदल करण्यासाठी आलेली ५० ते ६० प्रकरणे शिक्षण विभाग रोज हातावेगळी करत आहे. मुंबईत वाढत असलेला अक्षरनाम बदलाचा प्रवाह आता मराठवाडय़ातही रूढ होताना दिसत आहे.

शैक्षणिक उत्कर्ष, व्यावसायिक भरभराट किंवा शैक्षणिक सोय म्हणून नाव-आडनावातील अक्षरांमध्ये बदल करण्याचा सल्ला अलीकडे संबंधित विद्यार्थी अथवा त्याच्या पालकांना अक्षरज्योतिष अभ्यासक देतात. किंबहुना काही पालक-विद्यार्थी स्वउत्कर्षांसाठी नामाक्षर बदलण्याच्या अनुषंगाने अक्षरज्योतिष अभ्यासकांशी संधानही साधतात. त्यांच्या सल्ल्यानुसार नामबदलाचा मार्ग अवलंबतात. त्यातून ज्योतिषशास्त्रासारखी अक्षरशास्त्र ही एक शाखा वाढताना दिसतआहे. अक्षरशास्त्राच्या अभ्यासकांच्या सल्ल्यानुसार आद्य-अंतर्गत अक्षरांमध्ये बदल करण्याची कृती करून तसा एक अर्ज शिक्षण विभागाकडे अनेक जण करत आहेत.

पाच जिल्ह्य़ांत..

औरंगाबाद शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, बीड, परभणी व हिंगोली हे पाच जिल्हे येतात. या पाचही जिल्ह्य़ातून नाव-अक्षर बदलण्यासाठी येणाऱ्या अर्जाबाबत उपशिक्षणसंचालक अनिल साबळे म्हणाले, विवाहित, घटस्फोटित महिला नावात बदल करण्यासाठी अर्ज करतात. काही विद्यार्थी अलीकडे आईचेही नाव लावत आहेत. काही अर्जाचा नियमांच्या आधारे निपटारा केला जातो, तर अनवधानाने संबंधितांकडून झालेल्या क्षुल्लक चुका लक्षात आल्यानंतर बदलासाठी अर्ज केले जातात.’

होतेय काय?

काही जण दहावीची सनद तयार होण्यापूर्वी अक्षर बदलाचा निर्णय घेतात आणि सातवी, आठवी व नववीतच नामबदल करतात. काही विवाहित, घटस्फोटित महिला कौटुंबिक स्तरावरील स्थित्यंतरानुसार नातेसंबंधातील नाव-अक्षरांमध्ये बदल करत आहेत. काही विद्यार्थी अलीकडे स्वतपुढे आईचेही नाव लावत आहेत. काहींना नावापुढे लावलेले ‘राव’ अडचणीचे ठरते तर काहींना ते हवे असते. त्यानुसार तसा बदल करण्यासाठीही अर्ज येत आहेत.

उदाहरणार्थ..

‘सुनिता’ हे नाव इंग्रजीत लिहिताना एननंतर डबल ई-ई ऐवजी ‘आय’ असा किंवा एननंतर तीनवेळेला ईईई समाविष्ट केलेले ‘सुनीता’ असे अक्षर बदल करण्यासाठी अर्ज येतो. काही मुलांच्या नावातील अक्षरे बदलली जात आहेत,’ असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

ज्योतिषशास्त्राच्या प्राचीन ग्रंथांमध्ये अक्षरशास्त्राचा कुठेही उल्लेख आढळत नाही. सद्य:परिस्थितीत स्वतची हौस, शैक्षणिक, व्यावसायिक उत्कर्ष, लग्न जुळवतानाही नावामुळे बऱ्याचवेळा गुण जुळत नसल्याची अडचण उभी राहिल्यामुळेही एखाद्याने सुचवल्याप्रमाणे नावातील अक्षरांमध्ये बदल केला जात आहे, तशी सोयही अलीकडे उपलब्ध झालेली आहे. पूर्वी एखाद्या धर्मपीठाच्या गादीवर बसण्यासाठी किंवा दीक्षा घेण्याच्या विधिदरम्यान संबंधित व्यक्तीचे पूर्वाश्रमीचे नाव बदलले जात होते. नाव बदलले तरी व्यक्ती तीच आहे. जन्मनाव व व्यवहाराचे नाव वेगवेगळे असतात. नाव बदलण्याच्या कृतीला प्राचीन गं्रथानुसार काहीही आधार नाही.

– दिनेश कुलकर्णी, अभ्यासक

एखाद्या नावातील अक्षरांमध्ये बदल करण्याची अनेक प्रकरणे सध्या शिक्षण विभागाकडे येत आहेत. दिवसभरात ४० ते ५० प्रकरणे दाखल होत आहेत.

– बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी (मा.)