औरंगाबाद शहरात महावितरणकडून भारनियमन लागू करण्यात आले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कपात केल्याच्या विरोधात शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी सुभेदारी विश्राम गृहावर महावितरणच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत वीजचोरी आणि वीजबिल वसुली होत नसल्यामुळं वीज कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी खैरेंना सांगितले. तर काही नागरिकांनी निदान सकाळच्या वेळेत तरी वीज कपात करू नका, अशी विनंती अधिकाऱ्यांना केली. तेव्हा चंद्रकांत खैरे यांनी आक्रमक पवित्रा घेत आपण शिवसेनेवाले आहोत, आपण तडजोड का करायची? काहीही करून आपल्याला २४ तास वीज मिळालीच पाहिजे, असे म्हटले.

वीजचोरी आणि वसुली होत नसल्याचं कारण पुढं केलं जात असलं तरी वीज टंचाई हेच वीज कपातीचं खरं कारण असल्याचं खैरे यावेळी म्हणाले. अचानकपणे केलेल्या वीज कपातीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. हे सांगण्यासाठी खैरे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना फोन लावला. मात्र, चार ते पाच वेळेस फोन लावूनही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर ट्विटवर अडचणी मागवणार सरकार फोनवर उपलब्ध होत नाही, असं म्हणत खैरे यांनी या समस्येसंदर्भात मुख्यमंत्र्यांना ट्वीट् केलं. वीजचोरी केली तर गुन्हे दाखल केले जातात, मग वीज दिली नाही तर, काय करायचं असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. जे वीजबिल भरत नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. मात्र वीज कपात नको, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

औरंगाबाद संवेदनशील शहर आहे. रात्रीच्या वेळी वीज कपातीच्या निर्णयामुळे काहीही अनुचित प्रकार घडू शकतात. त्यामुळे शहरात भारनियमन नको, असं पत्र गृहमंत्रालयाकडून देण्यात आलं असल्याची आठवण त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना करून दिली. शिवसेना सत्तेत सहभागी आहे. मात्र सरकारच्या भूमिकेमुळं लोकांमध्ये विरोधाची भावना निर्माण होत आहे. असे घडत राहिल्यास सरकारचा उपयोग काय?, असा सवाल त्यांनी विचारला. त्यावर ज्या भागात वीजचोरी होते, त्या भागांमध्येच भार नियमन केले जात असल्याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले.