बियाणे उद्योगात असे महत्त्वाचे स्थान असलेल्या जालना शहरात एक अब्ज रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करून सीडपार्क उभारणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जागतिक बियाणे उद्योगात भारताचा क्रमांक सहावा आहे. शासकीय अहवालानुसार बियाणे उद्योगाची भारतातील वार्षिक उलाढाल जवळपास १५ हजार कोटी रुपये आहे. त्यापैकी ३३ टक्के म्हणजे सुमारे पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील बियाणे उद्योगाच्या एकूण उलाढालीत जवळपास तीन हजार कोटींची उलाढाल जालना शहरात होते. पोलाद उद्योगाबरोबरच बियाण्यांमध्ये जालना  प्रगती करणार आहे.

जालना शहराचे महत्त्व काय?

साधारणत: साडेचार दशकापूर्वी संकरित बियाणे महाराष्ट्रात तयार झाली आणि त्यामुळे जालना शहराचे नाव सर्वदूर झाले. कापूस, मका, ज्वारी, बाजरी त्याचप्रमाणे भाजीपाल्यातील संकरित बियाणांचे संशोधन आणि निर्मितीत जालना शहराचे मोठे योगदान राहिले. जैवतंत्रज्ञानावर आधारित बीटी कॉटन बियाण्यांचे संशोधन आणि निर्मितीत जालना अग्रेसर राहिले. जनुकीय अभियांत्रिकी शास्त्रातील प्रगतीमुळे कापसावरील बोंडअळीचे नियंत्रण करणारी क्षमता या पिकातच आणणाऱ्या बीटी कॉटन बियाण्याच्या व्यापारी तत्त्वावरील लागवडीस मान्यता जालना शहरातील उद्योगासच लाभली.

बीटीमध्ये अग्रेसर

बीटी (बॅसिलियस थुरिन्जीएन्सिस) हा मातीतील सामान्य जिवाणू असून त्याचा शोध पाच-सहा दशकांपूर्वीचा आहे. कापसावरील बोंडअळीच्या नियंत्रणासाठी बीटी पावडरचा वापर केला जात असे, परंतु त्याचा अपेक्षित परिणाम होत नव्हता. शास्त्रज्ञांनी या जिवाणूने तयार केलेली प्रथिने सरळ बियाण्यांत म्हणजे कापसाच्या पिकातच घातली. परंपरागत, प्रमाणिते, संकरित आणि त्यानंतर आलेले जनुकीय अभियांत्रिकी शास्त्रातील संशोधनावर आधारित बियाणे याचे जालना साक्षीदार  आहे.

जालना आणि औरंगाबाद बुलढाणा जिल्ह्य़ात २०० बियाणे कंपन्या कार्यरत आहेत. त्याद्वारे ४० हजार लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार मिळतो.

शेतकऱ्यांचा फायदा होईल का ?

जालना परिसरातील बियाणे उद्योगाची वार्षिक उलाढाल पाच वर्षांत तीन हजार कोटींवरून दुप्पट होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. तर शेतकऱ्यांचे उत्पन्न ४०० कोटी रुपयांवरून ६०० कोटी रुपयांपर्यंत वाढेल. महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाने प्रचलित नियमानुसार १३० एकर जमीन या प्रकल्पासाठी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. केंद्र शासनाच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाअंतर्गत पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याच्या कार्यक्रमांतर्गत सीडपार्कची उभारणी होणार आहे. त्यासाठी प्रकल्पाच्या ४६ टक्के म्हणजे ५० कोटी रुपये या कार्यक्रमांतर्गत मिळणार आहेत.

सीडपार्क कसे असेल?

जालना परिसरात बियाणे उत्पादन क्षेत्रासाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी सीडपार्क विकसित करण्याच्या संदर्भात ग्रॅण्ड थॉटन या सल्लागार कंपनीने प्राथमिक अहवाल तयार केला. या सीडपार्कमध्ये उद्योगासाठी पायाभूत सुविधा आणि सामुदायिक वाणिज्यिक सुविधा उपलब्ध करवून देणे अपेक्षित आहे. बियाणे तपासणी व संशोधन प्रयोगशाळा, शीतगृहे तसेच बियाणे उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर पायाभूत सुविधांचा विकास इत्यादी बाबी यामध्ये अंतर्भूत आहेत. या प्रकल्पाचा व्यवहार्यतेचा अहवाल आणि सविस्तर आराखडा तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ हे संयुक्तरीत्या या प्रकल्पासाठी राज्य अंमलबजावणी यंत्रणा आहेत.

 

संकलन : लक्ष्मण राऊत