शिक्षण विभागाचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानातील पुढचे पाऊल असलेले व्हॉट्सअॅपचे प्रत्येक जिल्ह्यात पाच समूह तयार करून शासकीय आदेशाची देवाण-घेवाण करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालकांनी केल्या आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी समूहाचा प्रमुख तयार करून हे गट सक्रिय करावेत. मात्र, या समूहावर शुभेच्छा, विनोद अथवा इतर संदेश टाकू नयेत, अशी स्पष्ट ताकीदही देण्यात आल्याने समूह प्रमुखाला खबरदारी घ्यावी लागणार आहे.
राज्यात प्रशासकीय यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्याचे प्रयत्न विविध पातळीवर सुरू आहेत. सुरुवातीला संगणक प्रणालीवर सरकारी कामकाजाचा वेग वाढवण्यात आल्यानंतर आता सर्वाधिक गतिमान ठरलेले व्हॉट्सअॅप तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कारभाराची गती वाढवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. शिक्षण उपसंचालकांनी एका आदेशाद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांना व्हॉटसअॅप समूह तयार करण्याचे आदेश बजावले आहेत. शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचे विभागनिहाय, जिल्हानिहाय समूह करण्यात येणार आहेत.
गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तारअधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यापर्यंत गट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक गट समूहात शिक्षण उपसंचालक व सहाय्यक संचालक यांना समाविष्ट केले जाणार आहे. शिक्षण विभागाच्या समूहावर केवळ प्रशासकीय आदेशाची देवाण-घेवाण, विविध माहिती, शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे, प्रशासकीय बाबींची अंमलबजावणी आदी विषयांचाच समावेश असणार आहे. या समूहावर वैयक्तिक शुभेच्छा, विनोद अथवा इतर माहितीचे संदेश टाकू नयेत, अशी स्पष्ट ताकीदही देण्यात आली आहे.