10 December 2018

News Flash

विवाहितेचा छळ; ४० कोटींची मागणी

तक्रार एका विवाहितेने सातारा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पत्नीकडे उद्योगधंद्यासाठी माहेराहून प्रत्येक वर्षी दोन ते तीन कोटी रुपये मिळून आतापर्यंत ४० कोटीं हुंडा स्वरुपात मागून शारीरिक, मानसिक छळ केल्याची तक्रार एका विवाहितेने सातारा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यावरून पती, सासऱ्यासह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पठण रोडवरील ग्रीन्स नाथ सीड्स कंपनीमागील बंगल्यात राहात असलेल्या मथिली अमित अहिरराव यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, पती अमित रमेश अहिरराव, एक महिला व सासरे रमेश केशव अहिरराव यांनी आई-वडिलांकडून हुंडा स्वरुपात मागितलेल्या रकमेची पूर्तता होऊ शकत नसल्यामुळे छळ केला. वारंवार चारित्र्यहनन, पतीकडून दारू प्राशन करून आल्यानंतर व अमली पदार्थाचे सेवन केल्यानंतर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, आई-वडिलांनाही शिवीगाळ करणे, असा त्रास लग्न झाल्याच्या दिवसापासून म्हणजे १५ जानेवारी २०१० पासून सुरू होता. मुलीला त्रास नको म्हणून आई-वडिलांनी पतीला वैयक्तिक खर्चासाठी व धंद्यासाठी २ कोटी ९० लाख रुपये धनादेशाद्वारे दिले आहेत. त्यानंतरही सोबत राहायचे असेल तर प्रत्येक वर्षी दोन ते तीन कोटी रुपये रोख स्वरुपात द्यावे लागतील, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहा, अशी धमकीही दिली जात असल्याचे मथिली अहिरराव यांनी महिला तक्रार निवारण केंद्राकडे दिलेल्या अर्जात म्हटले आहे.

या अर्जावरून सातारा पोलीस ठाण्यात मथिली यांचे पती अमित, सासरे रमेश व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मथिलीचे माहेर व सासर हे मोठय़ा उद्योजक घराण्यातील असल्याचे सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक भरत काकडे यांनी सांगितले.

First Published on January 7, 2018 2:22 am

Web Title: wife harassment by husband