तीन महिन्यांपूर्वी दिवसाआड एका हरणाला जीव गमवावा लागणाऱ्या लातूर जिल्हय़ात वन विभागातर्फे पाणवठे करून त्यात नियमितपणे पाणी टाकले जात आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत एकही हरीण मृत्युमुखी पडले नसल्याचे वन विभागातून सांगण्यात आले.

जिल्हय़ात सध्या अभूतपूर्व पाणीटंचाई आहे. जिल्हय़ात सुमारे १० ते १२ हजारपेक्षाही अधिक हरणांची संख्या आहे. तीन महिन्यांपूर्वी दिवसाआड एक हरीण मृत्युमुखी पडत असे. शेतात पाणी उपलब्ध नसल्यामुळे पाण्याच्या शोधार्थ हरणे रस्त्यावर येत व अपघाताचे प्रमाणही वाढले होते. जिल्हय़ात आतापर्यंत २५१ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. एका पाणवठय़ात ६ हजार लीटर पाणी मावेल, अशी त्याची रचना करून त्यात टँकरने पाणी घालणे सुरू केले. ज्या ठिकाणी जंगल नाही, तरीही हरणांची संख्या आहे अशा ठिकाणी २०० लीटर क्षमतेचे सिमेंटचे हौद ठेवून त्यात पाणी भरले जात आहे. जिल्हय़ात सुमारे २३ हौद तयार केले आहेत, असे वन परिक्षेत्र अधिकारी जी. एस. साबळे यांनी सांगितले.

लोणावळय़ाजवळील मन:शक्ती केंद्राच्या वतीने काही मंडळींनी जिल्हय़ात फिरून पाहणी केली व १० हौदांची रक्कम शिवाय दररोज एक टँकर पाण्याचा खर्च त्यांनी वन विभागाला देऊ केला. गेल्या दीड महिन्यापासून प्रत्येक पाणवठय़ात गरजेनुसार तीन-चार दिवसांनी टँकरने पाणी भरले जाते. पाणवठे तयार करताना सहजपणे प्राण्यांना पाणी पिता येईल, तसेच पाणवठय़ाची रचना बशीच्या आकाराची केल्यामुळे त्यात प्राण्यांचा बुडून मृत्यू होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी या उपक्रमासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला. आणखी किमान ५० पाणवठय़ांची गरज आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीतून हे पाणवठे उभे करण्याचा प्रयत्न असल्याचे साबळे यांनी सांगितले.